ईडी म्हणते, सदनिकांना सील ठोकले; प्रत्यक्षात 'त्या' ठिकाणी बिल्डरचेच टाळे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 07:14 AM2022-03-23T07:14:48+5:302022-03-23T07:15:13+5:30
रहिवासी अनभिज्ञच; म्हणाले, ही कागदोपत्रीच कारवाई असेल
ठाणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्याच्या कंपनीने बांधलेल्या ठाण्यातील वर्तकनगर येथील नीलांबरी प्रोजेक्टच्या ११ सदनिकांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी सील ठोकल्याचे जाहीर केले. मात्र, या कारवाईबाबत इमारतीमधील रहिवासी अनभिज्ञच होते. शिवाय या सदनिकांना ईडीने कोणतेही सील लावले नसून ही कागदोपत्री कारवाई असल्याचेही त्या इमारतीतील रहिवाशांनी सांगितले.
याच इमारतीमध्ये २४ व्या मजल्यावर श्रीधर पाटणकर यांचे कार्यालय आहे. ही इमारत पाटणकर आणि जोशी या दोघांच्या संयुक्त मालकीची असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. म्हाडाच्या पुनर्विकास योजनेतून तिचे बांधकाम झाले. २०१५ मध्ये इमारतीच्या बांधकामाला सुरुवात झाल्यानंतर २०२१ मध्ये तिचे काम पूर्ण झाले. गेल्या सहा महिन्यांपासून रहिवाशांना ताबा देण्यास सुरुवात झाली आहे.
‘नीलांबरी’ला ओसी नाही?
नीलांबरी इमारत ही २४ मजल्यांची असून, प्रत्येक मजल्यावर सात सदनिका आहेत. यामध्ये वन रूम किचन आणि टू रूम किचन, अशा प्रकारच्या सदनिका आहेत.
तळमजल्यावर १२ ते १६ गाळे आहेत. यातील बाजारभावानुसार वन बीएचके सदनिका ७५ लाखांची, तर टू बीएचके सदनिका ९५ लाखांपर्यंत आहे. अर्थात, इमारतीला ओसी अद्याप मिळाली नसल्याचे समजते.