मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्याच्या मालमत्तांवर ईडीची टाच; ११ सदनिका सील

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 07:05 AM2022-03-23T07:05:17+5:302022-03-23T07:05:50+5:30

पुष्पक ग्रुपची ६.४५ कोटींची मालमत्ता जप्त

ED Seizes Properties Belonging To CM Uddhav thackerays Brother In Law | मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्याच्या मालमत्तांवर ईडीची टाच; ११ सदनिका सील

मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्याच्या मालमत्तांवर ईडीची टाच; ११ सदनिका सील

Next

मुंबई : महाविकास आघाडीच्या मंत्र्यांमागे सुरू असलेला केंद्रीय तपास यंत्रणेच्या चौकशीचा ससेमिरा आता थेट मातोश्रीपर्यंत पोहोचला आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी पुष्पक ग्रुपच्या ६ कोटी ४५ रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या ठाण्यातील नीलांबरी प्रकल्पातील ११ सदनिका सील करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

ईडीने दिलेल्या माहितीनुसार, पुष्पक ग्रुपची कंपनी असलेल्या पुष्पक बुलियनविरोधात मार्च २०१७ मध्ये काळ्या पैशांबद्दल गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानंतर, पुष्पक बुलियन्सच्या २१.४६ कोटींच्या मालमत्तेवर ईडीने जप्तीची कारवाई केली होती. ही मालमत्ता महेश पटेल, चंद्रकांत पटेल व त्यांच्या कुटुंबीयांशी संबंधित होती. महेश पटेल यांनी नंदकिशोर चतुर्वेदी याच्या संगनमताने पुष्पक समूहातील पुष्पक रियल्टीचा निधी हस्तांतरित केला. पुष्पक रियल्टी डेव्हलपरने विक्रीच्या नावे हा निधी हस्तांतरित केला होता. यातूनच पुढे, चतुर्वेदीच्या नियंत्रणाखाली असलेल्या संस्थांना २०.०२ कोटींचे हस्तांतरण केले गेले.

नंदकिशोर चतुर्वेदी नावाचा डेटा एन्ट्री ऑपरेटर असून, त्याने हमसफर डीलर प्रा. लि. कंपनी या बनावट कंपनीच्या माध्यमातून ३० कोटींचे विनातारण कर्ज श्रीधर पाटणकर यांच्या मालकीच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. कंपनीत वळते केले. चतुर्वेदीशी संगनमत करून हा पैसा महेश पटेलने लाटला व तो श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि.च्या बांधकाम प्रकल्पात गुंतवला. 

सूड भावनेने सत्ताधाऱ्यांना त्रास 
सर्व केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर हा देशापुढील सध्याचा महत्त्वाचा प्रश्न आहे. राजकीय सुडाच्या हेतूने सत्ताधाऱ्यांना त्रास देण्यासाठी हा कार्यक्रम हातामध्ये घेण्यात आला आहे. स्पष्ट सांगायचं म्हणजे, पाच दहा वर्षांपर्यंत ईडीचं नाव कोणाला माहिती नव्हतं, पण आता तर गावागावांमध्ये ईडी पोहोचली आहे. या सर्व यंत्रणांचा सध्या दुर्दैवाने गैरवापर सुरू आहे. 
    - शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

नीलांबरी प्रकल्पातील वन बीएचके सदनिका ७५ लाखांची, तर टू बीएचके सदनिका ९५ लाखांपर्यंत आहे. अशा जवळपास १६८ सदनिका या प्रकल्पात आहेत.

बांधकाम कोणी केले?
नीलांबरीचे बांधकाम करणारी श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. ही कंपनी श्रीधर पाटणकर यांच्या मालकीची आहे. त्यातील ११ सदनिका मंगळवारी ईडीने सील केल्या.

Web Title: ED Seizes Properties Belonging To CM Uddhav thackerays Brother In Law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.