मल्ल्यांविरोधात कारवाईला सुरुवात, ईडीने 1411 कोटींची संपत्ती केली जप्त
By admin | Published: June 11, 2016 06:36 PM2016-06-11T18:36:25+5:302016-06-11T18:36:25+5:30
आयडीबीयच्या 900 कोटी कर्ज घोटाळ्यासंबंधी तपास करत असलेल्या ईडीने विजय मल्ल्यांची 1411 कोटींची संपत्ती जप्त केली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 11 - बँकांचे जवळपास 9000 कोटी रुपयांचे कर्ज बूडवून पसार झालेल्या विजय मल्ल्यांविरोधात सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) कारवाईला सुरुवात केली आहे. आयडीबीयच्या 900 कोटी कर्ज घोटाळ्यासंबंधी तपास करत असलेल्या ईडीने विजय मल्ल्यांची 1411 कोटींची संपत्ती जप्त केली आहे. विशेष म्हणजे ईडी सध्या फक्त आयडीबीयच्या 900 कोटी कर्ज घोटाळ्यासंबंधी तपास करत आहे. इतर तपासयंत्रणांशी चर्चा केल्यानंतर 17 बँकांच्या थकलेल्या 9000 कोटी कर्जासंबंधीही तपास केला जाण्याची शक्यता आहे.
मनी लाँड्रिंगच्या आरोपाचा सामना करीत असलेले मद्यसम्राट विजय मल्या यांना हद्दपार करून भारतात पाठविण्यास ब्रिटनने स्पष्ट नकार दिल्यानंतर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मल्यांना रेड कॉर्नर नोटिस पाठवण्यासाठी इंटरपोलकडे विनंती केली होती.
विजय मल्या यांना हद्दपार करून भारतात पाठविण्यास ब्रिटनने स्पष्ट नकार दिला होता. मल्ल्यांचे प्रत्यार्पण करण्यासाठी दुस-या पद्धतीचा अवलंब करण्याचा सल्ला त्यांनी दिला होता. रेड कॉर्नर नोटिस जारी केल्याने मल्ल्या यांच्या अडचणी वाढतील आणि त्यांना भारतात आणणंही शक्य होईल. कारण रेड कॉर्नर नोटिस जारी केल्यामुळे मल्ल्या ब्रिटन सोडून इतर कोणत्याही देशात प्रवास करु शकत नाही, आणि जर त्यांनी तसा प्रयत्न केला तर त्यांना अटक होऊ शकते. त्यामुळे ईडीने इंटरपोलला रेड कॉर्नर नोटिस जारी करण्यास सांगितलं आहे, जेणेकरुन मल्ल्यांनी ब्रिटनबाहेर प्रवास केल्यास विमानतळावरुन त्यांना अटक करण्यात येईल.
मुंबई उच्च न्यायालयाने विजय मल्ल्यांविरोधात अजामीपात्र वॉरंट जारी केलं आहे. तसंच पासपोर्ट रद्द करण्यात आला आहे या आधारावर ईडीने रेड कॉर्नर नोटिस जारी करण्याची विनंती केली गेली होती.