अनिल देशमुखांविरोधात ईडीकडून पुरवणी आरोपपत्र; ऋषिकेश आणि सलील यांच्याही नावाचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 06:35 AM2021-12-30T06:35:45+5:302021-12-30T06:35:56+5:30
Anil Deshmukh : ईडीने २ नोव्हेबर रोजी देशमुखांंना अटक केली. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.
मुंबई : सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात विशेष पीएमएलए कोर्टात बुधवारी ७ हजार पानांचे पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. यामध्ये देशमुख यांचे पुत्र ऋषिकेश आणि सलील यांच्याही नावाचा समावेश आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुखांवर केलेल्या १०० कोटी वसुली, भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांवरून मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) प्राथमिक तपास करून गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे. तर, याच गुन्ह्याच्या आधारे ईडीने देशमुख यांच्या विरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा नोंदवला होता.
यापूर्वी ऑगस्ट महिन्यात ईडीने पहिले आरोपपत्र दाखल केले होते. यामध्ये देशमुख यांच्या नागपूरमधील संस्था, श्री साई शिक्षण संस्था तसेच खासगी सचिव संजीव पालांडे, स्वीय सहाय्यक कुंदन शिंदेसह अन्य जणांचा समावेश होता. ईडीने २ नोव्हेबर रोजी देशमुखांंना अटक केली. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.
काय आहे आरोपपत्रात
ईडीने बुधवारी दाखल केलेल्या आरोपपत्रात देशमुख यांच्या जबाबासह माजी सचिव सीताराम कुंटे, माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि अन्य जबाबाचा समावेश आहे. तसेच, देशमुख यांच्या काळात पोस्टिंग झालेल्या १२ पोलीस उपायुक्तांंच्या जबाबाचाही समावेश आहे.
पोलीस बदली प्रकरणात देशमुख पिता-पुत्रांची एकत्रित चौकशी करण्यासाठी देशमुख यांच्या मुलांना समन्स बजावत चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. मात्र ते हजर झाले नाही. त्यामुळे या आरोपपत्रात दोन्ही मुलांच्या नावाचा समावेश आहे.