रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोवर ईडीची धाड, आव्हाडांचा अजितदादांवर नाव न घेता निशाणा, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 03:26 PM2024-01-05T15:26:25+5:302024-01-05T15:28:11+5:30
ED's raid on Rohit Pawar's Baramati Agro: आमदार रोहित पवार यांची मालकी असलेल्या बारामती अॅग्रो या कंपनीवर आज ईडीने धाड टाकल्याची माहिती समोर येत आहे. या कारवाईमुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे.
आमदार रोहित पवार यांची मालकी असलेल्या बारामती अॅग्रो या कंपनीवर आज ईडीने धाड टाकल्याची माहिती समोर येत आहे. या कारवाईमुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, बारामती अॅग्रोवर ईडीने टाकलेल्या धाडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांनी संतप्त प्रतिक्रिया देताना अजित पवार यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात आव्हाड यांनी रोहित पवार यांचा शरद पवार यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या पोस्टमध्ये आव्हाड म्हणाले की, रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो या कंपनीवर ईडीची धाड पडल्याची बातमी समजली. रोहित पवार हे शरद पवार यांच्यासोबत निष्ठेने आणि ताकदीने उभे राहिले त्याचे हे फळ आहे. वाईट याचेच वाटते की, यात आपलेच "घरभेदी" सहकारी सामील आहेत. परंतु मला विश्वास आहे की, रोहित पवार हे या सर्व दबावतंत्राला बळी तर पडणारच नाहीत, उलट अजून ताऊन सुलाखून बाहेर पडतील.
दरम्यान, पिंपळी (ता. बारामती)येथील बारामती अॅग्रो कंपनीवर केंद्रीय तपास यंत्रणांनी धाड टाकल्याची प्राथमिक माहिती आहे. आज सकाळी कंपनीत केंद्रीय तपास यंत्रणा पोहोचल्या, असे सांगण्यात येत आहे. या ठिकाणी माध्यम प्रतिनिधी माहिती घेण्यास तळ ठोकून आहेत. मात्र या धाडीबाबत अधिक माहिती मिळालेली नाही. तसेच केंद्रीय तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांचा देखील संपर्क होऊ शकलेला नाही.