मुख्यमंत्र्यांच्या नावे चिठ्ठी लिहून सुशिक्षित शेतकऱ्याची आत्महत्या
By admin | Published: September 12, 2015 01:51 AM2015-09-12T01:51:45+5:302015-09-12T01:51:45+5:30
शेतकऱ्यांबाबतच्या शासकीय धोरणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत मालेगाव तालुक्यातील एका सुशिक्षित, युवा शेतकऱ्याने गरुवारी रात्री आत्महत्या केली. मुख्यमंत्र्यांसह पोलीस
वाशिम : शेतकऱ्यांबाबतच्या शासकीय धोरणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत मालेगाव तालुक्यातील एका सुशिक्षित, युवा शेतकऱ्याने गरुवारी रात्री आत्महत्या केली. मुख्यमंत्र्यांसह पोलीस आणि आप्तेष्टांच्या नावे वेगवेगळी पत्रं लिहून या शेतकऱ्याने झाडाला गळफास घेऊन मृत्यूला कवटाळले. शेतकऱ्यांच्या समस्यांकडे मुख्यमंत्री अशाच प्रकारे दुर्लक्ष करीत राहिले, तर शेतकरी आत्महत्या होतच राहतील, अशी भीती या शेतकऱ्याने व्यक्त केली आहे.
अस्मानी व सुल्तानी संकटामुळे शेतकरी खचून गेला आहे. याच कारणामुळे मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे येथील दत्ता आत्माराम लांडगे या युवा शेतकऱ्याने गुरुवारी रात्री आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये त्याने विदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्यांकडे आपण जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला आहे. विदर्भातील शेतकरी दुष्काळाला घाबरत नाही; पण शेतीसाठी लागणारी साधने, भांडवल नसल्याने शेतकरी वैतागला आहे. पाणी आहे, पण वीज नाही. त्याचप्रमाणे मेहनत करायची इच्छा आहे, पण पुरेसे भांडवल नाही, असे त्याने नमूद केले आहे.
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबास एक लाखाची मदत दिली जाते. शासकीय कर्मचाऱ्यासाठी हा एक महिन्याचा पगार आहे, तर उद्योगपतीसाठी ती एक दिवसाची कमाई आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या सर्व कुटुंबांना शासनाने मासिक १0 हजार रुपये वेतन द्यावे, अशी अपेक्षाही या शेतकऱ्याने व्यक्त केली आहे.
दत्ताकडे १२ एकर शेती असून, त्याला एक भाऊ, एक बहीण, आई, वडील, पत्नी आणि मुलगा आहे. त्याने पत्नी तसेच आप्तेष्टांसाठी लिहिलेल्या पत्रांतून आपल्या आत्महत्येसारख्या कृत्याबाबत क्षमा मागितली आहे.