शिक्षण विद्यार्थीकेंद्री करावे
By admin | Published: May 16, 2016 04:30 AM2016-05-16T04:30:13+5:302016-05-16T04:30:13+5:30
आपली शिक्षण व्यवस्था ही अधिकाधिक विद्यार्थीकेंद्री करण्यावर भर राहील, असे प्रतिपादन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले.
मुंबई : विद्यार्थ्यांच्या मार्कलिस्टवरील नापास हा शिक्का पुसण्याचे काम आम्ही प्राधान्याने करणार आहोत, ते करताना विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांचा व कौशल्याचा विकास करण्याकडेही विशेष लक्ष देण्यात येईल. एकूणच
आपली शिक्षण व्यवस्था ही अधिकाधिक विद्यार्थीकेंद्री
करण्यावर भर राहील, असे
प्रतिपादन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले.
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या मुख्य सभागृहात शनिवारी सायंकाळी भीमराव भोयर यांच्या ‘शिक्षणवाटा चोखाळताना’ या पुस्तकाचे
प्रकाशन शिक्षणमंत्री तावडे
यांच्या हस्ते झाले. त्या वेळी तावडे बोलत होते. या वर्षीपासून दहावीप्रमाणेच बारावीच्या विद्यार्थ्यांचीदेखील पुरवणी
परीक्षा निकालानंतर एका महिन्यात घेतली जाणार आहे, असे तावडे म्हणाले.
या कार्यक्रमाला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके, आमदार कपील पाटील, अखिल भारतीय
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय संघटक श्याम मानव,
पुण्याच्या पद्मगंधा प्रकाशनाचे
अरुण जाखडे यांच्यासह
शिक्षण व प्रसारमाध्यम
क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
>येत्या २७ ते ३० मेदरम्यान दहावीच्या परीक्षेचा निकाल लावण्याचा प्रयत्न असून, एका महिन्यानंतर नापास विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षा घेतली जाणार आहे.
>विशेष म्हणजे या वर्षीपासून फेरपरीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे समुपदेशन करण्यात येणार असून, त्याआधारे या सर्व विद्यार्थ्यांना त्यांचा कल लक्षात घेऊन कौशल्य विकास प्रशिक्षणांतर्गत विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे, अशी माहिती विनोद तावडे यांनी दिली.