कोरोना संकटात शिक्षण खात्याला मन:शांतीचा शोध
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2020 07:33 AM2020-09-21T07:33:28+5:302020-09-21T07:33:55+5:30
शोधमित्रा उपक्रम : राज्यातील प्रत्येक अधिकारी, शिक्षकाला विपश्यना प्रशिक्षण
अविनाश साबापुरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोनामुळे सध्या सर्वत्र मानसिक दडपणाचे वातावरण निर्माण झाले आहे. यातून विद्यार्थी आणि शिक्षकही सुटलेले नाहीत. त्यामुळे राज्याचा शिक्षण विभाग आता मन:शांतीचा शोध घेणार असून त्यासाठी राज्यातील प्रत्येक शिक्षक आणि अधिकाऱ्यांना विपश्यना साधनेचे प्रशिक्षण दिले जाणार
आहे.
सध्याच्या कोविडसारख्या महामारीच्या प्रसंगात समाजातील प्रत्येक घटक अत्यंत कठीण परिस्थितीला सामोरा जात आहे. त्याचा सामना करण्यासाठी मन शांत आणि संतुलित ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळेच प्रत्येक विद्यार्थ्याने, शिक्षकाने आणि अधिकाºयाने विपश्यनेतील आनापान साधना करावी, असा कार्यक्रम शिक्षण आयुक्तालयाने हाती घेतला आहे. परंतु, विद्यार्थ्यांच्या आधी शिक्षक आणि अधिकाऱ्यांना या साधनेचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी २४ आणि २५ सप्टेंबर असे दोन दिवस सकाळी ७ ते ९ असे दोन तास आॅनलाइन प्रशिक्षण दिले जाणार आहे. मित्रा (माइंड इन ट्रेनिंग फॉर अवेअरनेस) उपक्रमांतर्गत होणाºया प्रशिक्षणासाठी इगतपुरी येथील विपश्यना विशोधन केंद्राचे सहकार्य घेतले जाणार आहे. सहभागी होण्यासाठी सध्या नोंदणीची मोहीम सुरू करण्यात आली असून प्रत्येक शिक्षकाला सहभागी करण्याची जबाबदारी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी शिक्षणाधिकारी आणि डाएट प्राचार्यांवर सोपविली आहे. विशेष म्हणजे यात शिक्षक, अधिकारी यांना आपल्या कुटुंबीयांनाही सहभागी करता येणार आहे.
कुणा-कुणाला संधी?
या प्रशिक्षणात प्राथमिक-माध्यमिक शिक्षकांसोबतच मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील अधिव्याख्याता, प्राचार्य, विभागीय उपसंचालक आदींसह त्यांच्या कुटुंबीयांना सहभागी होता येणार आहे.
दोनच दिवसांत ४३ हजारांची नोंदणी
केवळ दोन दिवसांत शिक्षण विभागातील तब्बल ४३ हजार ३१९ लोकांनी नोंदणी केल्याचे या कार्यक्रमाचे समन्वयक महेंद्र गायकवाड यांनी सांगितले. नोंदणीसाठी आणखी तीन दिवस शिल्लक आहेत.