शिक्षण विभाग सुरू करणार ' शैक्षणिक चॅनल '
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 06:00 AM2020-01-28T06:00:00+5:302020-01-28T12:39:02+5:30
राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने स्वतंत्र चॅनल सुरू करण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल
राहुल शिंदे -
पुणे: विद्यार्थ्यांना घरबसल्या आपल्या पुस्तकातील विविध घटकांची उजळणी करता यावी, अवघड वाटणारा विषय सहज समजावा, कविता चालीमध्ये कशा म्हणाव्यात, गणित कसे सोडवावे आदींचे ज्ञान राज्यातील विद्यार्थ्यांना दूरचित्रवाणी संचावरून (टीव्ही) मिळू शकणार आहे. त्यासाठी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने स्वतंत्र चॅनल सुरू करण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल टाकले आहे.
माहिती तंत्रज्ञानाच्या युगात इलेक्टॉनिक माध्यमाचा वापर करून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याच्या दृष्टीने केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. विद्यापीठ व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ‘स्वयंम’च्या माध्यमातून विविध अभ्यासक्रमाची उपलब्ध करून दिली आहे. त्यातच आता देशातील सर्व राज्यांनी आपल्या बोलीभाषेतील शैक्षणिक चॅनल सुरू करावे,अशा सूचना एमएचआरडीकडून प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (एससीईआरटी ) अधिका-यांनी नुकतीच गुजरात राज्यातील शैक्षणिक चॅनलची पाहणी केली आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर पाटील म्हणाले, एमएचआरडीकडून सुमारे पंधरा ते वीस दिवसांपूर्वी शैक्षणिक चॅनल सुरू करण्याबाबतचे पत्र प्राप्त झाले. या पत्रानुसार गुजरात येथील शैक्षणिक चॅनलची पहाणी करण्यात आली आहे. सध्या चॅनल सुरू करण्याबाबत प्राथमिक स्तरावर विचार सुरू आहे. मात्र, पुढील काळात राज्याच्या शिक्षण विभागाचा स्वतंत्र चॅनल सुरू झाले तर विद्यार्थ्यांना त्यांच्या पाठ्यपुस्तकातील कार्यक्रम घर बसल्या पाहता येतील. एससीईआरटीच्या माध्यमातून विविध शैक्षणिक कार्यक्रम तयार करता येतील. तसेच विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार प्रवेशपूर्व परीक्षांचे व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे मार्गदर्शक कार्यक्रमही दाखवता येतील.
--------
बालचित्रवाणी का बंद पाडली ?
मुला मुलांची... मजे मजेची... बालचित्रवाणी... हे बोल कानावर पडले की विद्यार्थी दूरचित्रवाणी संचासमोर येऊन बसत होतो.केंद्र शासनाच्या आर्थिक सहकार्याने १९८४ मध्ये मुंबईत बालचित्रवाणी सुरू झाली. दोन वर्षानंतर १४ नोव्हेंबर १९८६ रोजी बालचित्रवाणीचे कामकाज पुण्यातून सुरू झाले. विद्यार्थ्यांसाठी हजारो शैक्षणिक कार्यक्रम बालचित्रवाणीने तयार केले. बालचित्रवाणीचे कार्यक्रम पाहूनच अनेक विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडली. परंतु, केंद्र शासनाने २००३ पासून अनुदान देण्याचे बंद केल्यामुळे बालचित्रवाणीला टाळे लावावे लागले. आता विद्यार्थ्यांनी शैक्षणिक कार्यक्रम पाहून अभ्यास करावा, ही भूमिका समोर ठेऊन एमएचआरडीने सर्व राज्यांना शैक्षणिक चॅनल सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. मग पुण्यातील ‘बालचित्रवाणी’ का बंद पडली? असा सवाल उपस्थित होत आहे.