शहरांपेक्षा खेड्यातलेच शिक्षण लई भारी..! रिपोर्टमधून सुखद चित्र आले समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2023 07:03 AM2023-09-17T07:03:16+5:302023-09-17T07:03:27+5:30
नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हेच्या धर्तीवर (नॅस) राज्यातील प्रत्येक जिल्ह्याची शैक्षणिक स्थिती पुढे आणण्यासाठी स्टेट लर्निंग अचिव्हमेंट सर्व्हे (स्लॅस) ही चाचणी २४ मार्च रोजी घेण्यात आली होती
अविनाश साबापुरे
यवतमाळ : प्राथमिक शिक्षणासाठी प्रत्येक पालक शहरी शाळांकडे धाव घेत असला तरी अजूनही खेड्यांतील शिक्षणच सरस असल्याचा अहवाल राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने शुक्रवारी जाहीर केला. प्रत्येक जिल्ह्यात एकाच दिवशी तिसरी, पाचवी आणि आठव्या वर्गातील अध्ययन निष्पत्तींची तपासणी केल्यानंतर हा ‘स्लॅस’ अहवाल तयार करण्यात आला, हे विशेष; परंतु ३६ पैकी १८ जिल्ह्यांची शैक्षणिक संपादणूक राज्याच्या सरासरीपेक्षाही कमी असल्याचे यात आढळून आले.
नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हेच्या धर्तीवर (नॅस) राज्यातील प्रत्येक जिल्ह्याची शैक्षणिक स्थिती पुढे आणण्यासाठी स्टेट लर्निंग अचिव्हमेंट सर्व्हे (स्लॅस) ही चाचणी २४ मार्च रोजी घेण्यात आली होती. यात मराठी आणि गणित या दोन विषयांमध्ये विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती जाणून घेण्यासाठी दीड आणि दोन तासांचा पेपर सोडवून घेण्यात आला होता. अहवालात राज्याची मराठी विषयातील अध्ययन संपादणूक ६९.५८ टक्के, तर गणितातील संपादणूक ६०.६९ टक्के आली आहे.
राज्यातील अध्ययन निष्पत्तीत सुधारणा व्हावी म्हणून २४ मार्चला स्लॅस चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीचा शुक्रवारी जाहीर झालेला अहवाल म्हणजे प्रत्येक जिल्ह्याचा शिक्षण निर्देशांक असेल. - अमोल येडगे, संचालक, एससीईआरटी, पुणे