शिक्षणासाठी आसरा हवा

By admin | Published: October 23, 2014 11:46 PM2014-10-23T23:46:08+5:302014-10-23T23:48:59+5:30

ऊसतोडणी कामगारांच्या मुलांच्या शाळेचा प्रश्न : शिक्षण विभागाची साखर कारखानदारांना विनंती

Education is the place for refuge | शिक्षणासाठी आसरा हवा

शिक्षणासाठी आसरा हवा

Next

भीमगोंडा पाटील - कोल्हापूर -कारखानदार, शेतकऱ्यांना यंदाच्या गळीत हंगामाचे वेध लागले आहेत. अनेक कारखान्यांचे बॉयलर अग्निप्रदीपन झाले आहे. येत्या काही दिवसांत जिल्ह्यात बीड, उस्मानाबाद, लातूर या भागांतून ऊसतोडणी मजुरांच्या ‘टोळ्या’ दाखल होणार आहेत. या टोळ्यांसोबत येणाऱ्या त्यांच्या मुलांसाठी नियमित शाळेत शिक्षणाची सोय केली आहे. मात्र, वारंवार ऊसतोडणीच्या निमित्ताने भटकंती करणाऱ्या कुटुंबांची मुले नियमित शाळेत दाखल करताना अडचणींचा डोंंगर उभा राहत आहे. यामुळे शिक्षणापासून वंचित राहून मुलांच्या शिक्षणाची पाटी फुटण्याची वेळ येत आहे. म्हणून यंदा शिक्षण विभागाने आतापासूनच ऊसतोडणी मजुरांच्या मुलांसाठी ‘तुम्ही निवासाची सोय करा; आम्ही जेवण, शिक्षण देतो,’ असा प्रस्ताव कारखानदारांसमोर ठेवला आहे.
पश्चिम महाराष्ट्रात प्रत्येक वर्षी ऊसतोडणी मजूर जिल्ह्यात पाठीवर संसार घेऊन स्थलातंरित होत असतात. आई, वडिलांसोबत शाळेला जाणारी मुलेही असतात. पुन्हा गावाकडे जाईपर्यंत संंबंधित मुले शिक्षणापासून वंचित राहतात. यामुळे सर्वशिक्षा अभियानातून ऊसतोडणी मजुरांच्या मुलांसाठी हंगामी शाळा सुरू केल्या जात होत्या. ज्या गावात मुले आहेत, तेथेच शाळा सुरू केली जात होती. झाडाखालीही शिक्षणाचे धडे दिले जात होते.
दरम्यान, हक्काचे शिक्षण कायदा आला. त्यामुळे दोन वर्षांपासून साखरशाळेची संकल्पना बंद झाली. स्थलातंरित कुटुंबातील मुलांना नियमित शाळेत दाखल करून घेण्याची तरतूद झाली. कोणत्याही कागदपत्राची विचारणा न करता प्रवेश दिला जातो. याचा फायदा घेऊन वीटभट्टीवर काम करणाऱ्या कुटुंबातील मुले नियमित शाळेत जात आहेत. परंतु, ऊसतोडणी मजुरांना ज्या गावात ऊस असेल तेथे जावे लागते. काही वेळेला प्रत्येक दिवशी गावे बदलावी लागतात. अशावेळी संंबंधित मजुरांच्या मुलांना नियमित शाळेत दाखल करणे अडचणीचे आहे. रोज नव्या शाळेत जाणे बालमनाला रुचतही नाही. मुले स्वत:हूनच शाळेकडे पाठ फिरवितात. वारंवार स्थलांतर होणाऱ्या कुटुंबांच्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणताना अनेक अडथळे येत आहेत.
किमान हंगाम संपेपर्यंत तरी ऊसतोडणी मजुरांची मुले कारखाना स्थळावरच राहावीत, त्या मुलांच्या वसतिगृहाची सोय संबंधित कारखान्यांनी करावी, असा प्रयत्न शिक्षण विभाग करीत आहे. याला प्रतिसाद देऊन गेल्या हंगामात दत्त साखर कारखान्याने वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करून दिली होती. तेथे शिक्षण विभागाने जेवण व शिक्षणाची सोय केली. यामुळे मुलांना शिक्षण घेणे सोपे झाले. यंदा अजून कामगारांच्या टोळ्याही आलेल्या नाहीत; पण शिक्षण विभाग सर्व कारखानदारांशी संपर्क साधून ऊसतोडणी मजुरांच्या शिक्षणासाठी राहण्याची सुविधा उपलब्ध
करून हातभार लावावा, अशी विनंती करीत आहे.
ऊसतोडणी मजुरांच्या मुलांना नियमित शाळेत दाखल करून घेतले जात आहे. मात्र, वारंवार स्थलांतर होणाऱ्या कुटुंंबांच्या मुलांना नियमित शाळेत दाखल करून घेताना अडचणी येत असतात. यामुळे कारखान्यांनी निवासाची सोय केल्यास शिक्षण विभाग जेवण व शिक्षणाची सोय करायला तयार आहे. यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गेल्या वर्षी दत्त कारखान्याने मजुरांच्या मुलांसाठी राहण्याची सुविधा उपलब्ध केली होती. सर्व कारखान्यांनी निवासासाठी सहकार्य केल्यास मुलांची सोय होणार आहे.
- स्मिता गौड (शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षण, कोल्हापूर)

Web Title: Education is the place for refuge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.