शिक्षणाद्वारेच शेतीवरील अतिरिक्त बोजा कमी होईल!

By Admin | Published: February 27, 2017 05:03 AM2017-02-27T05:03:12+5:302017-02-27T05:03:36+5:30

शेतीवरील लोकसंख्येचा अतिरिक्त बोजा शिक्षणाद्वारे कमी करणार नाही तोपर्यंत प्रगतीच्या वाटा खुल्या होणार नाहीत

Education will reduce agricultural burden! | शिक्षणाद्वारेच शेतीवरील अतिरिक्त बोजा कमी होईल!

शिक्षणाद्वारेच शेतीवरील अतिरिक्त बोजा कमी होईल!

googlenewsNext

अविनाश चमकुरे,
नांदेड- ज्या शेतकरी कुटुंबात शिक्षण वाढले, तिथे सुबत्ता आली़ त्यामुळे शिक्षण घ्या, केवळ शेतीवर विसंबून राहू नका, जोपर्यंत शेतीवरील लोकसंख्येचा अतिरिक्त बोजा शिक्षणाद्वारे कमी करणार नाही तोपर्यंत प्रगतीच्या वाटा खुल्या होणार नाहीत, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी रविवारी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या १९व्या दीक्षांत समारंभात केले़
अध्यक्षस्थानी राज्यपाल तथा कुलपती सी़ विद्यासागर राव होते़ मंचावर पालकमंत्री अर्जून खोतकर, कुलगुरु डॉ़ पंडित विद्यासागर, प्र-कुलगुरु डॉ़ गणेशचंद्र शिंदे यांची उपस्थिती होती़ शरद पवार म्हणाले, शेतीवर अवलंबून राहणारी लोकसंख्या जेवढी अधिक, तिथे गरीबी अधिक हे समीकरण जगभर दिसेल़ ज्या ठिकाणी शेती करणारा वर्ग अन्य क्षेत्रात गेला, तिथे स्थिती बदलली आहे़ इंग्लंड, जर्मनी, जपान, अमेरिका आदी देशात १२ ते २० टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत़ त्यामुळे ते देश प्रगत दिसत आहेत़ याउलट भारत, इंडोनेशिया, श्रीलंका, बांग्लादेश या सर्व ठिकाणी लोकसंख्येच्या साठ टक्क्यांपेक्षा अधिक लोक शेतीवर अवलंबून आहेत़ म्हणूनच येथे बेरोजगारी, दारिद्र्य पहायला मिळत़े त्यासाठी शेतीवरचा भार कमी होणे गरजेचे आहे़
विविध विद्याशाखेत प्रथम येणाऱ्या ४१ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक देऊन यावेळी गौरविण्यात आले़ शरद पवार यांना देण्यात आलेल्या मानपत्राचे वाचन मराठी विभागप्रमुख डॉ़ केशव सखाराम देशमुख यांनी केले़
>विद्यापीठास ५० लाखांची देणगी
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात शिक्षण घेणारे बहुतांश विद्यार्थी ग्रामीण भागातील आहेत़ आर्थिक अडचण शिक्षणात अडसर ठरू नये, या उद्देशाने पवार चॅरीटेबल ट्रस्टच्यावतीने ५० लाख रुपये स्वारातीम विद्यापीठास देण्याचे शरद पवार यांनी घोषित केले़ ही रक्कम बँकेत डिपॉझिट करून यातून मिळणाऱ्या व्याजाच्या रकमेतून दरवर्षी पाच विद्यार्थ्यांना डॉ़ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतीबा फुले, यशवंतराव चव्हाण, पद्मश्री श्यामराव कदम आणि शारदाबाई पवार यांच्या नावे शिष्यवृत्ती देण्याची सूचना त्यांनी यावेळी केली़
शरद पवार यांना डी़लीट
सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने राज्यपाल तथा कुलपती सी़ विद्यासागर राव यांच्या हस्ते शरद पवार यांना डी़लीट़ या सर्वोच्च मानद पदवीने गौरविण्यात आले़
यापूर्वी २००८ मध्ये पुणे येथील टिळक विद्यापीठ व २०१३ मध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने त्यांना डी़लीट़ या उपाधीने सन्मानीत केले आहे़

Web Title: Education will reduce agricultural burden!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.