भारतीय महिलांवर आजही अंधश्रद्धेचा प्रभाव, ही दुर्दैवी बाब
By admin | Published: January 7, 2017 03:04 AM2017-01-07T03:04:48+5:302017-01-07T03:04:48+5:30
एकविसाच्या शतकाकडे प्रभावीपणे वाटचाल करणाऱ्या भारतीय महिलांवर आजही अंधश्रद्धेचा प्रभाव आहे
महाड : एकविसाच्या शतकाकडे प्रभावीपणे वाटचाल करणाऱ्या भारतीय महिलांवर आजही अंधश्रद्धेचा प्रभाव आहे, ही बाब अत्यंत दुर्दैवी असल्याची खंत ज्येष्ठ लेखिका ऊर्मिला पवार यांनी व्यक्त केली. कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पाचव्या महिला साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी त्या संमेलनाध्यक्षा म्हणून बोलत होत्या. तर पुस्तक आणि साहित्याची जागा कुणीही घेऊ शकत नाही. बुद्धीला खाद्य देणाऱ्या वाचन संस्कृतीला तोड या जगात असूच शकत नाही, असे प्रतिपादन संमेलनाच्या उद्घाटक ज्येष्ठ कवयित्री उषा मेहता यांनी केले.
ऊर्मिला पवार म्हणाल्या की, महिला साहित्य संमेलनामुळे सहभागी होणाऱ्या महिलांना नवी प्रेरणा आणि ऊर्जा मिळणार आहे. स्त्री आणि पुरुषांमध्ये फरक नाही. मात्र, आजच्या स्त्रिने संरक्षण कवच बाजूला करून कणखार बनण्याची खरी गरज आहे. तेराव्या शतकात समाजव्यवस्थेसमोर अगंतुक आणि घुसमट होऊनही ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांनी सारे सहन करीत, संयम राखला हा त्या भावंडांचा मोठेपणा होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांच्या सक्षमीकरणाचा विचार त्या काळी मांडला होता. मात्र, त्या विचारांना महिलांनीच दुर्दैवाने विरोध केला. त्या वेळी महिला सक्षमीकरणासाठी डॉ. बाबासाहेबांचे विचार अमलात आणले असते, तर आजची महिला अधिक प्रगल्भ झाली असती. यासाठी महिलांच्या मानसिक तेमध्ये बदल होणे आवश्यक असल्याचे मतही ऊर्मिला पवार यांनी व्यक्त करताना आजही संपूर्ण देशभरात महिलांवरील होणाऱ्या अत्याचाराबाबत तीव्र संताप आणि खेद व्यक्त केला.
आजचे विश्व समजून घ्यायचे असेल तर स्त्रीशक्तीचा जागर होणे आवश्यक आहे. शेतीमालाला योग्य हमीभाव मिळण्यासाठी शेतकऱ्यांना आंदोलनो करावी लागत आहेत. तर कर्जबाजारीपणामुळे या शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागतात ही कृषिप्रधान म्हणवून घेणाऱ्या भारताची शोकांतिका म्हणावी लागेल, असे उषा मेहता यांनी सांगताना, आजची महिला, समाजकारणाबरोबरच राजकारणातही उत्तम काम करू शकते, हे अनेक महिलांनी आज दाखवून दिले आहे. मात्र, राजकारणात सक्रियपणे भाग न घेणाऱ्या महिलांनी राजकीय घडामोडीनंतर लक्ष ठेवले पाहिजे. कर्तृत्ववान महिलेच्या नेतृत्वाखाली कामकाज करणाऱ्या पुरुषांना त्याचा कमीपणा वाटतो. महिलांनीही तू विधवा, तू सौभाग्यवती असा भेदभाव न करता मतिभ्रम टाळावा, असा सल्लाही उषा मेहता यांनी या वेळी दिला.
या वेळी महाडच्या नगराध्यक्षा स्नेहल जगताप, कोमसाप विश्वस्त रेखा नार्वेकर, संमेलन समितीप्रमुख उषा परब, कार्याध्यक्षा नमिता किर, स्वागताध्यक्षा शोभा सावंत, कार्याध्यक्षा सुनंदा देशमुख यांचीही भाषणे झाली. डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारकात झालेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुकन्या जोशी यांनी केले. कार्यक्रमापूर्वी विरेश्वर मंदिर येथून भव्य ग्रंथदिंडी काढण्यात आली. महाडकर नागरिक तसेच शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. ६ ते ८ जानेवारी या तीन दिवसांत या संमेलनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह परिसंवाद, चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आलेले आहे. (वार्ताहर)