तणावातून मुक्त होण्यासाठी संगीत थेरपी ठरतेय प्रभावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 05:57 AM2018-12-23T05:57:28+5:302018-12-23T05:57:36+5:30
संगीतमय वातावरणात लहानाची मोठी झालेल्या मानसीने, आईकडून संगीताचा वारसा घेतला, पण तिला प्रवाहापेक्षा वेगळी वाट चोखाळायची होती.
- विद्या राणे-शराफ
संगीतमय वातावरणात लहानाची मोठी झालेल्या मानसीने, आईकडून संगीताचा वारसा घेतला, पण तिला प्रवाहापेक्षा वेगळी वाट चोखाळायची होती. आज प्रत्येक जण तणावात जगतो. मात्र, कितीही तणाव असला, तरी आपल्या आवडत्या संगीताचे सूर कानी पडले की, लगेच आपला तणाव या तर डोळ्यांवाटे वाहून जातो किंवा मग आनंदाची अशी काही अनुभूती होते की, खूप फ्रेश वाटते. गाणे गाण्याची इच्छा प्रत्येक जण बाळगतो, पण संगीत साधना करायची, म्हणजे सर्वप्रथम आपल्या आवाजात गोडवा असावा लागतो. मात्र, या गोष्टीपेक्षा वेगळा विचार करत मानसीने, आईची स्वत:ची संगीत संस्थानिर्मितीची अपूर्ण राहिलेली इच्छा ‘स्वरमानस’च्या रूपात पूर्ण केली, तीही ‘एनी बडी कॅन सिंग’ ही टॅगलाइन घेऊन.
‘सिंगेथॉन २८’ या नवीन वर्षात संगीत क्षेत्रातील लोकप्रिय व्यक्तींच्या मांदियाळीत रंगणाऱ्या संगीतमय स्पर्धा कार्यक्रमाच्या निमित्ताने मानसी केळकर-तांबेशी बोलण्याची संधी मिळाली. मानसी सांगते, गायन क्षेत्रात येणाºयांसाठीच नव्हे, तर प्रत्येक संगीतप्रेमीसाठी ‘स्वरमानस’अंतर्गत ‘सिंगेथॉन २८’चा मंच उपलब्ध करून दिला आहे. एरव्ही प्रत्येकाने कारकिर्द घडविण्यासाठीच गायले पाहिजे, असे नाही. स्वत:ला खूश करण्यासाठी, तणावमुक्त होण्यासाठी, सर्व दु:ख विसरून स्वत:च स्वत:ला गवसण्यासाठी काही सूर छेडणे आवश्यक आहे. संगीत थेरपी ही अशी गोष्ट आहे, जी माणसाला एका सुखावणाºया विश्वात घेऊन जाते. तणावमुक्त व्हायचे असेल, तर दिवसाची सुरुवात संगीताने करा. पाहा, दिवसभर किती प्रसन्न वाटते.
स्वरमानसच्या अंतर्गत अगदी अडीच वर्षांच्या मुलांपासून ते ८० वर्षांच्या वयोवृद्धांपर्यंत मानसी केवळ गाणेच शिकवित नाही, तर त्यांचे काउंन्सिलिंंगही करते. तिने फिलॉसॉफीमध्ये मास्टर पदवी प्राप्त केली आहे. पालकांबाबत बोलताना मानसी सांगते, आजच्या पालकांना एक किंवा दोनच अपत्ये असतात. त्यामुळे त्यांच्या मुलांकडून जास्त अपेक्षा तर असतातच, पण ते मुलांबाबत जास्त हळवेही असतात. साहजिकच, मुलांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये सतत हस्तक्षेप होतो. मुले तुमची असतात, ही गोष्ट जरी खरी असली, तरी ती तुमची प्रॉपर्टी नव्हेत. त्यांना मन, भावना व विचार करणारा स्वतंत्र मेंदू आहे, ही गोष्ट पालकांनी कायम लक्षात ठेवली पाहिजे. त्यात व्यंग घेऊन जन्माला आलेल्या मुलांबाबत पालक जास्तच चिंतित होतात. अशा मुलांवर मानसीने मोफत संगीतोपचार केले आहेत, ज्याचा खूप सकारात्मक परिणामही दिसून येऊन ती मुले जास्त सक्रिय, आनंदी झाल्याचे मानसी सांगते.
केवळ संगीत क्षेत्रातच नव्हे, तर आपण ज्या समाजात वावरतो, त्यांचेही काहीतरी देणे लागतो, या विचारधारेतून मानसी सामाजिक कार्यातही अग्रेसर आहे. ‘सिंगेथॉन २८’मधून मिळणारा फायदा ती स्पेशल डिसीस असणाºया मुलांसाठी डोेनेट करणार आहे. मानसी सांगते की, कोणतेही कार्य करताना पैसा कमविणे हा उद्देश मी कधीच ठेवला नाही. तर त्यातून समाजातील गरजूंना मदतीचा हात देण्याचा माझा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. सिंगेथॉन-२८ हा कार्यक्रम ज्या लोकांना गाण्याची इच्छा असते, पण त्यांना संधी मिळत नाही, ज्यांना स्वत:ला मंचावर आजमावून पाहायचे आहे, अशा लोकांसाठी आयोजित केला आहे. यासाठी परीक्षक म्हणून माझी आई सुप्रसिद्ध गायिका उत्तरा केळकर तर आहेच, पण सर्वांचे लाडके सुप्रसिद्ध संगीतकार व माझे गुरू अशोक पत्कीही परीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. कलाकारांसाठी काहीतरी करायला मिळतेय, याचा मला खूप आनंद वाटतोय. यात माझ्या टीमसहीत सर्वांचेच सहकार्य मला मिळतेय. सर्वांच्या जीवनात आनंद पेरण्यासाठी पुढेही माझी धडपड अशीच सुरू राहणार आहे.’