मांगीतुंगीच्या विकासासाठी प्रभावी नियोजन व्हावे
By admin | Published: November 8, 2015 12:23 AM2015-11-08T00:23:04+5:302015-11-08T00:23:04+5:30
नाशिक जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र मांगीतुंगी येथील महोत्सवासाठी आवश्यक असलेल्या सर्व सोईसुविधा, उपाययोजना आदींच्या तयारी संदर्भात प्राथमिक आराखडा तयार करण्यात
मुंबई : नाशिक जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र मांगीतुंगी येथील महोत्सवासाठी आवश्यक असलेल्या सर्व सोईसुविधा, उपाययोजना आदींच्या तयारी संदर्भात प्राथमिक आराखडा तयार करण्यात यावा व त्या विषयीची कामे तातडीने मार्गी लावण्याच्या दृष्टीने प्रभावी नियोजन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिले.
श्रीक्षेत्र मांगीतुंगी येथील महोत्सवाच्या निमित्ताने करावयाच्या तयारीबाबत फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक झाली. खा. डॉ. सुभाष भामरे, आ. दीपिका चव्हाण, आ. सीमा हिरे, आ. बाळासाहेब सानप, आ. राहुल आहेर, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सुनील पोरवाल, नगर विकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर, नाशिकचे जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, जिल्हा नियोजन अधिकारी प्रदीप पोदा, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे आदी बैठकीला उपस्थित होते.
मांगीतुंगी येथे ११ ते १६ फेब्रुवारी २०१६ या कालावधीत मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि महामस्तकाभिषेक सोहळा होणार आहे. त्यासाठी जगभरातून १५ ते २० लाख भाविक येण्याची अपेक्षा आहे, अशी माहिती खा. भामरे व माजी खा. जे. के. जैन यांनी मुख्यमंत्र्यांना दिली. संस्थांचे स्वामी किर्तीजी यांनी मुख्यमंत्र्यांना महोत्सवास येण्याचे निमंत्रणही दिले. नाशिकचे जिल्हाधिकारी कुशवाह यांनी मांगीतुंगी तीर्थक्षेत्राबाबत सादरीकरण केले.
मुख्यमंत्री म्हणाले, ‘मांगीतुंगी तीर्थक्षेत्राच्या विकासाच्या दृष्टीने आराखडा तयार करताना तातडीची कामे व तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी दीर्घकालीन उपाययोजनांसंदर्भात सविस्तर आराखडा तयार करावा. महोत्सव कालावधी विचारात घेऊन तातडीच्या कामांना पूर्ण करण्यासाठी नियोजन करणे आवश्यक असून, त्या दृष्टीने राज्य शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल,’ असेही त्यांनी पुढे सांगितले. (विशेष प्रतिनिधी)