अण्णा हजारे यांना प्रभावी सुरक्षाव्यवस्था
By admin | Published: May 16, 2016 02:04 AM2016-05-16T02:04:41+5:302016-05-16T02:04:41+5:30
अण्णा हजारे यांना प्रभावी सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. योग्य ती काळजी घेतली जात असून, चिंता करण्याचे कारण नाही, असे राज्याचे पोलीस महासंचालक (डीजी) प्रवीण दीक्षित यांनी रविवारी सांगितले
नागपूर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रभावी सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. योग्य ती काळजी घेतली जात असून, चिंता करण्याचे कारण नाही, असे राज्याचे पोलीस महासंचालक (डीजी) प्रवीण दीक्षित यांनी रविवारी सांगितले.
हिंगणा, जुनी कामठी आणि कामठी पोलीस ठाणी पोलीस आयुक्तालयाला जोडण्यात आली. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने दीक्षित नागपुरात आहे. त्यांनी रविवारी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी अण्णा हजारे यांना मिळालेल्या धमकीचा प्रश्न उपस्थित झाला असता, त्यांनी अण्णांची पुरेशी काळजी घेतल्याचे सांगितले.
जहाल नक्षलवादी रंजिता हिला पोलिसांनी बनावट चकमकीत मारल्याचा आरोप होत आहे, याकडे लक्ष वेधले असता दीक्षित यांनी त्या आरोपात तथ्य नसल्याचे म्हटले. पोलिसांशी चकमकीतच तिचा मृत्यू झाल्याचे सांगून नक्षलग्रस्त भागात पोलिसांचे काम अतिशय चांगले असल्याचा दावा त्यांनी केला. पोलीस अत्याधुनिक शस्त्रांचा वापर करीत आहेत. पोलीस मदत केंद्रात लोकांची वर्दळ वाढली असून, लोकांचा पोलिसांवरील विश्वास वाढल्याने नक्षल चळवळीला घरघर लागल्याचे ते म्हणाले.