‘ला-निनो’च्या प्रभावामुळे आंबा हंगाम लांबणार? हवामान बदलाचा परिणाम; काजू पिकालाही बसणार फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2020 02:09 AM2020-10-20T02:09:39+5:302020-10-20T06:55:20+5:30
‘ऑक्टोबर हीट’मुळे जमीन कोरडी होते. त्याचा झाडांच्या मुळांवर नैसर्गिक ताण येतो. त्यानंतर नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये थंडी सुरू झाल्यानंतर आंबा, काजूच्या झाडांना मोहोर येण्यास प्रारंभ होतो. मात्र ‘ला-निनो’च्या प्रभावामुळे वादळी पाऊस अधूनमधून सुरूच आहे. त्यामुळे जमिनीतील ओलावा अद्याप कायम आहे. जर हा ओलावा कमी झाला नाही तर आंबा हंगाम लांबणीवर पडणार, हे निश्चित.
रत्नागिरी : पॅसिफिक महासागरात ‘ला-निनो’चा प्रभाव मे महिन्यापासून राहिल्याने यावर्षी पावसाळा लांबला आहे. हेच वातावरण कायम राहिल्यास हवामानातील बदलाचा परिणाम आंबा, काजू या पिकांवर होण्याची भीती आहे. परिणामी, आंब्याचा हंगाम यंदा लांबणीवर पडण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. ‘ऑक्टोबर हीट’मुळे जमीन कोरडी होते. त्याचा झाडांच्या मुळांवर नैसर्गिक ताण येतो. त्यानंतर नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये थंडी सुरू झाल्यानंतर आंबा, काजूच्या झाडांना मोहोर येण्यास प्रारंभ होतो. मात्र ‘ला-निनो’च्या प्रभावामुळे वादळी पाऊस अधूनमधून सुरूच आहे. त्यामुळे जमिनीतील ओलावा अद्याप कायम आहे. जर हा ओलावा कमी झाला नाही तर आंबा हंगाम लांबणीवर पडणार, हे निश्चित.
काय आहे ‘ला-निनो’?
पॅसिफिक महासागरामध्ये विषुववृत्तीय प्रदेशातील पाण्याचे तापमान अचानक कमी होते. यामुळे आशिया व पॅसिफिक महासागराच्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. पॅसिफिक महासागरात मे महिन्यापासून शून्य ते उणे ०.५ एवढे तापमान राहिले आहे. सध्या हे तापमान उणे १ इतके झाले आहे. त्यामुळे या स्थितीला नॉर्मल ‘ला-निनो’ असे संबोधले जाते. सध्या नॉर्मल ‘ला-निनो’चा प्रभाव आहे. त्याच्या प्रभावामुळे जागतिक थंडीचीही लाट येऊ शकते.
असा आहे ‘अल्-निनो’ -
‘अल्-निनो’ म्हणजे विषुववृत्तीय प्रदेशातील पॅसिफिक महासागरात पाण्याचे तापमान अचानक वाढणे. यामुळे आशिया व प्रशांत महासागराच्या प्रदेशात पाऊस कमी होऊन दुष्काळी स्थिती उद्भवते व दक्षिण अमेरिका खंडात अतिवृष्टी होऊन पुराचा सामना करावा लागतो. सध्या पाऊस थांबण्यासाठी ‘अल्-निनो’चा प्रभाव वाढण्याची आवश्यकता आहे. ‘अल-निनो’ चा प्रभाव वाढला तर उबदार वातावरण किंवा उष्णतेची लाट येऊ शकते.
भारतीय हवामान विभागाने मार्चपर्यंत ‘ला निनो’ नॉर्मल राहण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे हवेत गारठा राहण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर निम्मा अधिक संपला तरी पाऊस रेंगाळला आहे. ऑक्टोबर हीट जाणवली नसल्याने झाडांच्या मुळांना नैसर्गिक ताण न बसल्याने गारठा वाढला तरी त्याचा प्रभाव झाडांवर होणार नाही. परिणामी यावर्षी आंबा हंगाम लांबण्याची शक्यता आहे. -डॉ. व्ही. जी. मोरे, हवामान शास्त्रज्ञ, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली.