वीजबिलाची वसुली कार्यक्षमतेने करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2017 02:48 AM2017-02-06T02:48:33+5:302017-02-06T02:48:33+5:30

ग्राहकांनी वापरलेल्या प्रत्येक युनिटची वसुली अत्यावश्यक असून, त्यासाठी संबंधितांनी अधिक कार्यक्षमतेने काम करण्याची गरज आहे.

Efficiently recover electricity bill | वीजबिलाची वसुली कार्यक्षमतेने करा

वीजबिलाची वसुली कार्यक्षमतेने करा

Next

मुंबई : ग्राहकांनी वापरलेल्या प्रत्येक युनिटची वसुली अत्यावश्यक असून, त्यासाठी संबंधितांनी अधिक कार्यक्षमतेने काम करण्याची गरज आहे. यात हयगय करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी दिला आहे.
महावितरणच्या चार प्रादेशिक संचालकांसह सर्व १६ परिमंडलातील मुख्य अभियंता व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत संजीवकुमार यांनी थकबाकी वसुलीसाठी अधिक गांभीर्याने कार्यरत व्हावे, असे निर्देश दिले आहेत. सध्या महावितरणची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असून, थकबाकी वसुलीशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. त्यासाठी सातत्याने वीजवसुली मोहिमा राबवाव्यात, विशेषत: कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित ग्राहकांच्या थकबाकी वसुलीबरोबरच, चालू वीजबिल पूर्णपणे वसूल व्हावे, यावर लक्ष केंद्रित करावे, तसेच ज्यांचा वीजपुरवठा खंडित केला आहे, त्यांचे क्रॉस चेकिंग करून, जर काही ग्राहक गैरमार्गाने वीज घेत असतील, तर त्याच्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.


युनिटची वसुली गरजेची
महावितरणचा कारभार सुरळीत चालण्याकरिता, ग्राहकांनी वापरलेल्या प्रत्येक विजेच्या युनिटची वसुली होणे गरजेचे आहे. दर महिन्याला कोणत्या विभागाने किती वसुली करायची, याचे उद्दिष्ट ठरवून देण्यात येत असते.


वसुलीचे उद्दिष्ट साध्य करण्याचे निर्देश
दर महिन्याची वसुली, ठरवून दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा बरीच कमी होत असून, याबाबतची कारणेही रास्त नसल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी, ही वसुली नेटाने व्हावी, यासाठी सर्व मुख्य अभियंत्यांना वसुलीचे उद्दिष्ट साध्य करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

ग्राहकांच्या मोबाइल नोंदणीचे प्रमाण वाढवा
ग्राहकांनी वापरलेल्या विजेचे अचूक बिलिंग होण्यासाठी यंत्रणा सक्षम करावी, ग्राहकांच्या मोबाइल नोंदणीचे प्रमाण वाढवावे, तसेच कर्मचाऱ्यांनी दैनंदिन कामकाजात मोबाइल अ‍ॅपचा वापर करून, कामात गतिशीलता व पारदर्शकता आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Web Title: Efficiently recover electricity bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.