मुलींच्या शासकीय वसतिगृहासाठी प्रयत्नशील
By admin | Published: June 9, 2017 02:55 AM2017-06-09T02:55:08+5:302017-06-09T02:55:08+5:30
महाड येथे मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह बांधण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी गुरुवारी महाड येथे दिली.
विशेष प्रतिनिधी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : महाड येथे मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह बांधण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी गुरुवारी महाड येथे दिली. सामाजिक न्याय विभागाकडून महाड येथे १०० मागासवर्गीय मुलांकरिता भव्य वसतिगृह बांधण्यात आले आहे. या इमारतीमध्ये एकूण ३४ खोल्या असून स्वयंपाकगृह, डायनिंग हॉल, वाचनालय, व्यायामशाळा यांचा समावेश आहे. या इमारतीकरिता ५ कोटी ६९ लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. मागासवर्गीय मुलांच्या या वसतिगृहाच्या उद्घाटनप्रसंगी बडोले बोलत होते.
सामाजिक न्यायमंत्री बडोले म्हणाले, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकासाकरिता समाजकल्याण विभाग विशेष प्रयत्न करत असून याकरिता बार्टी या संस्थेकडून विविध उपक्र मांचे आयोजन करण्यात येते. याचा लाभ या वसतिगृहातील मुलांनी घेऊन आपली क्षमता सिद्ध करावी. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे सामाजिक समतेचा लढा दिला. अशा या क्रांतिभूमीतील चवदारतळ्याच्या पाण्याचे शुद्धीकरण करण्याची यंत्रणा बसविण्याबाबत कार्यवाही करणार असे म्हणाले.
राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांनी शासकीय वसतिगृहातील मुलींच्या सुरक्षेबाबतही समाजकल्याण विभागाकडून विशेष लक्ष दिले जाते असे सांगितले. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत डॉ.आंबेडकर समाजभूषण पुरस्काराचे आयोजन करण्यात येईल असे सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे, आ. भरत गोगावले आदी उपस्थित होते.
जावळी येथील निवासी शाळेचे उद्घाटन
माणगाव तालुक्यातील जावळी येथील अनुसूचित जातीच्या मुलांच्या शासकीय निवासी शाळेचे उद्घाटन सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी समाजकल्याण विभागाचे उपायुक्त यशवंत मोरे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. आभार प्रदर्शन समाज कल्याण सहायक आयुक्त प्रसाद खैरनार यांनी केले.