संसदेचे महत्त्व कमी करण्याचे प्रयत्न, संजय राऊत यांची खंत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2020 12:53 AM2020-01-07T00:53:14+5:302020-01-07T00:53:24+5:30
लोकशाहीत संसदेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मात्र सध्या संसदेचे महत्त्व कमी करण्याचे, संसद चालूच नये असे प्रयत्न केले जात आहेत.
मुंबई : लोकशाहीत संसदेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मात्र सध्या संसदेचे महत्त्व कमी करण्याचे, संसद चालूच नये असे प्रयत्न केले जात आहेत. सीएएवर संसदेत नऊ तास चर्चा सुरू असताना पंतप्रधान मात्र नऊ मिनिटेही उपस्थित राहत नाहीत. काँग्रेसने नेहमी संसदेला महत्त्व दिले. सध्या केवळ विधेयके मंजूर करण्यासाठी संसदेचा वापर केला जात आहे, अशी खंत शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली.
मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे आयोजित पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. या वेळी राऊत यांच्या हस्ते मनश्री पाठक, सदानंद खोपकर, गुणाजी काजिर्डेकर, जयू भाटकर, संजीवनी खेर, वैभव परब व तेजस वाघमारे यांना पुरस्काराने गौरवण्यात आले. संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, आमदार सुनील प्रभू, प्रकाश सुर्वे, माजी आमदार सुनील शिंदे, पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
राऊत म्हणाले, राज्यात परिवर्तन करण्याची क्षमता बाळासाहेब ठाकरे यांच्यात होती व शरद पवार यांच्यामध्ये आहे. राज्यात परिवर्तन व्हावे असा ठाम निर्णय पवारांनी घेतला होता. पवार राष्ट्रपती, पंतप्रधान व्हावेत अशी आमची सदिच्छा आहे. ते पंतप्रधान, राष्ट्रपती होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पवार राष्ट्रपती झाल्यास मराठी माणसाला आनंद वाटेल. पवारांचे राजकीय व सामाजिक कार्य फार मोठे आहे. नरेंद्र वाबळे व संजय परब यांनी राऊत यांची प्रकट मुलाखत घेतली. धनश्री प्रधान दामले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले.
बाळासाहेब टीका करणाऱ्यांना बोलावून त्यांच्याशी संवाद साधायचे. बाळासाहेबांची शिवसेना उद्धव ठाकरे यांनी पुढे नेली. त्यांच्यामध्ये चांगले प्रशासकीय गुण आहेत. त्यांच्यात व माझ्यात वाद करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. मात्र आमची दोघांची चांगली मैत्री आहे, असे राऊत म्हणाले. सरकारविरोधात उभे राहणे हा देशद्र्रोह नाही. मात्र सध्या तसे चित्र निर्माण केले जात आहे. सध्या अप्रत्यक्ष आणीबाणीसारखी परिस्थिती आहे. त्याविरोधात आवाज उठवण्याचे काम केले. दिल्लीची दहशत झुगारून लावण्याचा प्रयत्न महाराष्ट्राने केला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राजकारणात काम करताना केंद्रात मंत्री होणे सहज शक्य होते. मात्र सामनाचा राजीनामा द्यावा लागला असता त्यामुळे मंत्रिपद स्वीकारले नाही, मंत्री झाल्यास सामनाशी, पत्रकारितेशी संपर्क सुटेल अशी भीती होती, असे राऊत म्हणाले.
>हिंदुत्वावर कायम
शिवसेनेने हिंदुत्व सोडले हा अपप्रचार केला जात आहे. सावरकर हे महान आहेत. त्यांचा अपमान सहन केला जाणार नाही. सावरकरांना भाजपने सत्तेवर आल्यावर पहिला भारतरत्न पुरस्कार देण्याची गरज होती. मात्र त्यांनी साडेपाच वर्षांत पुरस्कार दिला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच अयोद्धेला जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली. सरकार धर्माच्या आधारावर नव्हेतर, किमान समान कार्यक्रमावर चालते. हे सरकार पाच वर्षे चालेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. धर्मावर पोट भरत नाही. सरकार संविधानानुसार चालेल, असेही राऊत यांनी सांगितले.