मुक्त शिक्षणाला गतिमान करण्यासाठी प्रयत्न
By admin | Published: March 8, 2017 05:35 PM2017-03-08T17:35:05+5:302017-03-08T17:35:05+5:30
मुक्त विद्यापीठाचे नूतन कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन यांचा मानस
नाशिक : दूर शिक्षण पद्धतीत बदल झाल्याने अनेक आव्हानेदेखील उभी राहिली आहेत. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकार्पंत पोहोचण्यासाठी शिक्षणाची गंगा अधिक गतिमान करण्याचा मानस असून, त्यासाठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याचा विचार असल्याचे नूतन कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन यांनी सांगितले.
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने स्थापन झालेल्या या विद्यापीठाचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. त्यांच्या विद्यापीठात काम करण्याची संधी मिळाली ही निश्चित आनंदाची बाब आहे. कुलगुरू म्हणून कामकाज करताना मुक्त शिक्षणाची व्याप्ती वाढविणे हे महत्त्वपूर्ण काम सर्वांच्या सहकार्याने करणार आहे. मुक्त शिक्षण हे एक सांघिक काम आहे. ही जबाबदारी पार पाडताना सर्व घटकांची मदत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
शैक्षणिक क्षेत्रात कामकाज करताना नियमित मूल्यमापन करून त्यामध्ये बदल करणे ही नैसर्गिक बाब असते. अधिक स्पर्धात्मक अभ्यासक्रम असला म्हणजे त्याची गुणवत्ता वाढत असते. त्यामुळे पुढील काळात शैक्षणिक कामकाज करताना काही बदल नक्कीच केले जातील. प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता असेल व ती कटाकक्षाने पाळली जाईल. तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचविण्यासाठी अधिक भर द्यावा लागणार आहे.
विद्यापीठाचे नाव ऐकून असल्याने ते जाणून घेण्याची इच्छा होतीच, आता प्रत्यक्ष कुलगुरू म्हणून कामकाज करण्याची संधी मिळाली आहे. विद्यापीठाचे कामकाज आधुनिक करण्याबरोबरच विभागीय केंद्रे अधिक गतिमान आणि कार्यक्षम करू असा आपणास विश्वास आहे, असे वायुनंदन यांनी सांगितले.