राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे प्रयत्न सुरू; गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2022 01:47 PM2022-04-23T13:47:13+5:302022-04-23T13:50:30+5:30

राज्य सरकार अस्थिर करून राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे प्रयत्न; गृहमंत्र्यांनी दोघांची नावं घेतली

Efforts to impose presidential rule in the state claims Home Minister Dilip Walse Patil | राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे प्रयत्न सुरू; गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांचा दावा

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे प्रयत्न सुरू; गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांचा दावा

Next

मुंबई: हनुमान चालिसा पठणावरून राज्यातलं वातावरण तापलं आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा केली आहे. राणा दाम्पत्याविरोधात शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. राणा विरुद्ध सेना संघर्ष पेटला असताना गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी कायदा सुव्यवस्था उत्तम असल्याचा दावा केला. समाजात तेढ निर्माण होणारं वर्तन टाळण्याचं आवाहन त्यांनी केलं. ते पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संवाद साधत होते.

सध्याच्या परिस्थितीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी फोनवरून चर्चा केली आहे. कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासाठी योग्य पावलं उचलण्याच्या सूचना त्यांनी केल्या असल्याचं गृहमंत्र्यांनी सांगितलं. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडली असल्याचं भासवण्याचा प्रयत्न काही जणांकडून सुरू आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे पुढे करण्यात आलेलं एक प्यादं आहे. कायदा सुव्यवस्था बिघडवून सरकार अस्थिर करून राष्ट्रपती राजवट लावण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा दावा त्यांनी केला.

मुख्यमंत्र्यांनी हनुमान चालिसा पठण करावी यासाठी इतका आग्रह कशासाठी, असा सवाल दिलीप वळसे-पाटलांनी उपस्थित केला. राणा यांच्याकडून प्रसिद्धीसाठी स्टंट सुरू आहेत. त्यांना हनुमान चालिसा पठण करायची असल्यास त्यांच्या मुंबई, अमरावती, दिल्लीतील घरी करावी, असा सल्ला गृहमंत्र्यांनी दिला. भाजपकडून शिवसेनेच्या हिंदुत्वावर वारंवार बोट ठेवलं जात आहे, त्याबद्दल काय वाटतं, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर हिंदुत्व हा दोन पक्षांमधला विषय आहे. त्यावर मी बोलणार नाही, असं गृहमंत्री म्हणाले. 

Web Title: Efforts to impose presidential rule in the state claims Home Minister Dilip Walse Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.