तंदुरुस्तीसाठी कैद्यांना मिळणार अंडी
By admin | Published: August 9, 2016 04:05 AM2016-08-09T04:05:35+5:302016-08-09T04:05:35+5:30
शिक्षा भोगत असलेले व कच्च्या कैद्यांना रोज उकडलेली अंडी खाता येणार आहेत. श्रावण महिन्यामुळे सध्या अनेकांनी मांसाहार वर्ज्य केला असला तरी जेलमधील कैद्यांना इच्छेनुसार रोज दोन
जमीर काझी, मुंबई
शिक्षा भोगत असलेले व कच्च्या कैद्यांना रोज उकडलेली अंडी खाता येणार आहेत. श्रावण महिन्यामुळे सध्या अनेकांनी मांसाहार वर्ज्य केला असला तरी जेलमधील कैद्यांना इच्छेनुसार रोज दोन अंडी स्वखर्चाने विकत घेता येतील. त्यांचे आरोग्य सृदढ रहावे, म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे तुरुंग प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
राज्यात मध्यवर्ती कारागृहासह विविध स्तरावर एकूण २२७ तुरुंग आहेत. त्यामध्ये सुमारे २९ हजारांहून अधिक कैदी राहतात. यापैकी ९ हजार कैदी हे शिक्षा झालेले तर उर्वरित कच्चे (अंडरट्रायल) कैदी आहेत. त्यांना प्रशासनाकडून रोज नाश्ता व दोन वेळा जेवण दिले जाते. त्याशिवाय प्रत्येक तुरुंगात ठेकेदारीवर नेमण्यात आलेल्या कॅन्टीनमधून कैदी स्वखर्चाने जेवण घेऊ शकतो. औरंगाबाद येथील मध्यवर्ती कारागृहातील कैदी मुक्ताराम शिंदे याने याबाबत अर्ज वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केला होता. मध्य विभागाच्या डीआयजीमार्फत तो अप्पर महासंचालक व कारागृह महानिरीक्षक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्याकडे आला. त्यांनी कैद्यांचे आरोग्य व मानवतेच्या दृष्टिकोनातून कॅन्टीनमध्ये रोज उकडलेली अंडी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे.