ठाकरे सरकारला 'इगो' महत्वाचा; कोरोना संकट व उपाययोजनांचं काही देणे घेणे नाही : प्रवीण दरेकर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2020 07:46 PM2020-09-23T19:46:21+5:302020-09-23T20:21:02+5:30
विरोधी पक्षांच्या सूचनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्याचे काम ह्या सरकारने आजपर्यंत केले आहे.
पुणे : महाविकास आघाडी सरकारने राज्यातील कोरोनाची वस्तुस्थिती मान्य करून आणि विरोधी पक्षाच्या सूचना स्वीकारत त्यावर काम केले गेले असते तर आज नक्कीच परिस्थिती वेगळी पाहायला मिळाली असती. तसेच खूप प्रश्न मार्गी देखील लागले असते. पण हे सरकार आजतागायत फक्त वस्तुस्थिती नाकारत आले आहे. कोरोना संकटाचा सामना करताना सरकारमध्ये नियोजनाचा पूर्ण अभाव आहे. त्यामुळेच कोरोना परिस्थिती हाताळण्यात ठाकरे सरकारला शंभर टक्के अपयश आले आहे. ठाकरे सरकारला 'इगो' महत्वाचा आहे; कोरोना संकट व उपाययोजनांचं काही देणे घेणे पडलेले नाही , अशा शब्दात विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकार घणाघाती आरोप केला आहे.
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे पुणे दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी राज्यातील कोरोना परिस्थिती व राज्य सरकारवर भाष्य केले. दरेकर म्हणाले, विरोधी पक्षांच्या सूचनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्याचे काम ह्या सरकारने आजपर्यंत केले आहे. आणि विरोधीपक्ष राजकारण करतोय आणि सरकार पाडण्याचे षडयंत्र रचतोय असं म्हणून मोकळे व्हायचे. परंतु, सरकारने वास्तव स्वीकारत आमच्या सूचना स्विकारल्या तर परिस्थितीवर निश्चित नियंत्रण मिळवता आले असते.परंतू ह्या सरकारचा मोठा प्रॉब्लेम म्हणजे ते अहंकाराने गच्च भरलेले आहे. त्यापुढे लोकांच्या जीवनाचं आणि उपाययोजना यांचं काही देणे पडलेलं नाही. तसेच ह्या सरकारमधले नेते मंडळी सुद्धा फक्त अहंकार, एकमेकांवरच्या कुरघोडी आणि विसंवादाच्या भोवतीच घुटमळत आहे..
महाविकास आघाडी सरकारने सातत्याने आमच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले आहे. आम्ही ऑक्सिजन बेड व व्हेंटिलेटर आणि रेमडेसिव्हिरचा तुटवडा असल्याचे दाखवून दिले की ते व्यवस्थेच्या दोषांवर पांघरून घालून सत्य परिस्थिती नाकारतात. आणि सर्व वैद्यकीय यंत्रणा सुरळीत असून औषधांचा पुरवठा पुरेसा प्रमाणात असल्याचे ठामपणे सांगतात.