शहरातील आठ क्रशर मशीन सील
By admin | Published: October 19, 2016 01:42 AM2016-10-19T01:42:57+5:302016-10-19T01:42:57+5:30
अवैध गौणखनिज वाहनाऱ्या २७ वाहनांवर अप्पर तहसीलदार प्रशांत बेडसे पिंपरी- चिंचवड हवेली यांनी धडक कारवाई केली आहे़
पिंपरी : शहरातील अवैधरीत्या गौणखनिज उत्खननावर बंदी असताना, अनधिकृतरीत्या उत्खनन केल्यामुळे ८ क्रशर मशीन सील करून, अवैध गौणखनिज वाहनाऱ्या २७ वाहनांवर अप्पर तहसीलदार प्रशांत बेडसे पिंपरी- चिंचवड हवेली यांनी धडक कारवाई केली आहे़ त्यांच्याकडून सुमारे २३ लाख २७ हजारांचा दंड वसूल केला आहे़
चार दिवसांत तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली ही सर्वांत मोठी कारवाई झाली आहे़ उर्वरीत गौणखनिज उद्योजकांचा साडेआठ लाखांचा दंड लवकरच वसूल केला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली़ मुरूम, माती, वाळू, दगड, डबर, खडी हे गौणखनिजात येते़ रॉयल्टी न भरता गौणखनिजांचे बेकायदेशीर उत्खनन केल्यामुळे कारवाई केल्याची माहिती बेडसे यांनी दिली़
१ सप्टेंबरला क्रशर मालकांच्या बैठकीत कर न भरल्यास कारवाई करण्याची नोटीस दिली होती़ तरीही संबंधितांनी गौणखनिजांचे अनधिकृत उत्खनन सुरू ठेवले़ त्यामुळे तहसील कार्यालयामार्फत दोन महिन्यांपूर्वी अवैध गौणखनिज उत्खनन करणाऱ्यांना पहिली नोटीस देण्यात आली होती़ मालमत्ता अटकाव करण्यासाठी दुसरी नोटीस देऊन दंड वसुली सुरू केली आहे.(प्रतिनिधी)
>अनधिकृत उत्खनन : धडक कारवाईची मोहीम
शासनाच्या नियमांप्रमाणे उत्खनन करण्यापूर्वी डबर, मुरुम, वाळू, माती यांची रॉयल्टी भरणे बंधनकारक आहे़ परंतु अनेकांकडून या नियमाची पायमल्ली केली जाते. त्यामुळे धडक मोहीम सुरू केली असून, एकूण २७ वाहनांवर कारवाई करण्यात आली़ त्यामध्ये वाळूची वाहतूक करणाऱ्या ८ ट्रक आहेत़ तर १९ ट्रकमध्ये अवैधरीत्या मुरूम, डबर, खडीची वाहतूक करताना पकडण्यात आल्या आहेत़ कारवाईची गौणखनिज तसेच वाळूची वाहतूक करणाऱ्यांनी धास्ती घेतली आहे़ या कारवाईत तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार संजय भोसले, मंडलाधिकारी सूर्यकांत पाटील, कामगार तलाठी, कोतवाल यांनी सहभाग घेतला़
अवैधरीत्या गौणखनिज उत्खनन आणि वाहतूक बंद करण्यासाठी, तसेच वाळूची चोरटी वाहतूक बंद करण्यासाठी धडक मोहिमेचा वेग वाढविण्यात येणार आहे़ वारंवार नोटिसा देऊनही अवैध गौणखनिज थांबले नाही, तर गरज पडल्यास फ ौजदारी कारवाई करणार आहे़
- प्रशांत बेडसे, अप्पर तहसीलदार, पिंपरी- चिंचवड