उजनी पाणलोट क्षेत्रातील वीजपुरवठा आठ तास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2016 01:38 AM2016-08-08T01:38:42+5:302016-08-08T01:38:42+5:30
उजनी पाणलोटक्षेत्रातील शेतीपंपांचा वीजपुरवठा पाच तासांवरून आठ तासांवर आणण्यास शनिवारी (दि. ६) पालकमंत्री गिरीश बापट यांनी मान्यता दिली
इंदापूर : उजनी पाणलोटक्षेत्रातील शेतीपंपांचा वीजपुरवठा पाच तासांवरून आठ तासांवर आणण्यास शनिवारी (दि. ६) पालकमंत्री गिरीश बापट यांनी मान्यता दिली. याबाबत आदेश जिल्हाधिकारी सौरभ राव यांना दिला आहे. त्याअनुषंगाने राव यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
शनिवारी पालकमंत्री गिरीश बापट, जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्यासमवेत कालवा सल्लागार समितीची बैठक होती.
त्या बैठकीपूर्वी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उजनी पाणलोट क्षेत्रातील शेतीपंपांचा वीजपुरवठा पाच तासांवरून आठ तासांवर आणण्याची मागणी केली होती. बैठकीच्या वेळी इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी जोरदारपणे हीच भूमिका मांडली. निवेदनही सादर केले. निवेदनाची दखल घेऊन पालकमंत्री बापट यांनी पुढील कार्यवाही केली.
हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी अजित पवार व भरणे यांचा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू होता. उजनी धरणातील पाणीसाठा बेरजेमध्ये आल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील, जिल्हा परिषद
सदस्य प्रतापराव पाटील, तुकाराम बंडगर, साहेबराव चोपडे आदी उपस्थित होते.
सोलापूर शहर व जिल्ह्यातील ग्रामीण
भागात झालेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उजनी धरणातील पाण्याचा साठा आरक्षित केला होता.
त्यामुळे उजनी धरणाच्या पाणलोटक्षेत्रातील इंदापूर, करमाळा, माढा, कर्जत, श्रीगोंदा, दौंड तालुक्यातील उपसा जलसिंचन योजनेच्या शेतीपंपांचा विद्युत पुरवठा गेले सहा महिने आठ तासांऐवजी पाच तास केला होता. त्यामुळे उजनीच्या शेतकऱ्यांचे शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले होते.