मृतांच्या वारसांना आठ लाखांची मदत
By admin | Published: December 19, 2014 02:43 AM2014-12-19T02:43:48+5:302014-12-19T02:43:48+5:30
चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा मूल, सावली, नागभीड, सिंदेवाही, चिमूर तालुक्यात नरभक्षक वाघ व बिबट्याने धुमाकूळ घालून फेब्रुवारी ते नोव्हेंबर २०१४ या कालावधीत आठ व्यक्तींना ठार मारले
नागपूर : राज्यातील वनक्षेत्रांजवळ वन्यप्राण्यांच्या हल्ल्याच्या घटना वाढत आहेत. यावर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने शासनाकडून हरतऱ्हेने प्रयत्न करण्यात येत आहेत. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्यांच्या वारसांना पाचऐवजी आठ लक्ष रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. चंद्रपूर जिल्ह्यातील वनक्षेत्रात वाघाच्या वाढत्या हल्ल्यांसंदर्भातील मुद्याकडे शोभाताई फडणवीस, संजय दत्त, भाई जगताप व शरद रणपिसे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून सभागृहाचे लक्ष वेधले.
चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा मूल, सावली, नागभीड, सिंदेवाही, चिमूर तालुक्यात नरभक्षक वाघ व बिबट्याने धुमाकूळ घालून फेब्रुवारी ते नोव्हेंबर २०१४ या कालावधीत आठ व्यक्तींना ठार मारले. या वाघाला गोळ्या घालून ठार करण्यात आले. यापुढे अशा घटना होऊ नयेत यासाठी राज्य शासनाने निरनिराळे कार्यक्रम हाती घेतले आहेत. यात सुरक्षेसोबतच वनक्षेत्रात राहणाऱ्या लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी बांबू प्रशिक्षण केंद्रदेखील तयार करण्यात येत आहे. येथील प्रशिक्षितांना मोफत बांबू पुरविण्यात येईल असे मुनगंटीवार यांनी सांगितले.
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्यांचे वारस किंवा जखमींना एका महिन्याच्या आत मदत झालीच पाहिजे अशा सूचना देण्यात येतील. जर कुठल्याही अधिकाऱ्याने यात दिरंगाई दाखवली तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असे आश्वासनदेखील त्यांनी दिले.(प्रतिनिधी)