महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2024 05:00 AM2024-11-17T05:00:53+5:302024-11-17T05:03:14+5:30
शिर्डी/कोल्हापूर : महाराष्ट्रात १० लाख कोटींची गुंतवणूक केल्याचा दावा केला जात आहे. परंतु सेमी कंडक्टर, एअरबस यासह सहा हजारांहून ...
शिर्डी/कोल्हापूर : महाराष्ट्रात १० लाख कोटींची गुंतवणूक केल्याचा दावा केला जात आहे. परंतु सेमी कंडक्टर, एअरबस यासह सहा हजारांहून अधिक उद्योग राज्याबाहेर गुजरातला गेल्याने आठ लाख नोकऱ्या गेल्या. जीएसटीने मोठे नुकसान झाले. रोजगाराची निर्मिती करण्याची कोणतीही योजना त्यांच्याकडे नाही, असा घणाघात काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी शनिवारी केला.
भाजप नेते सातत्याने राहुल गांधी व बाळासाहेब ठाकरे यांच्या संबंधाने बोलतात. पण, राहुल यांची बहीण म्हणून सांगू इच्छिते की, काँग्रेस आणि बाळासाहेब यांची विचारधारा वेगळी असली, तरी आम्ही शिवरायांचा सन्मान करतो. तुम्ही शिवरायांचे नाव घेता, पण त्यांचा अवमान करता, अशी कठाेर टीकाही प्रियंका यांनी शिर्डी येथील सभेत केली.
शिर्डी येथील सभेला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, खासदार भाऊसाहेब वाकचौरे उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीतील त्यांची राज्यातील ही पहिलीच सभा होती. कोल्हापुरातही त्या प्रथमच आल्या होत्या. या सभेत खासदार शाहू छत्रपती, आमदार सतेज पाटील, कुस्तीपटू बजरंग पुनिया, आमदार विश्वजीत कदम आदी उपस्थित होते.
अपमानाविरुद्ध पेटून उठा...
जनता महागाईने पिचली आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही. युवक रोजगार मिळत नसल्याने त्रस्त आहे. तरीही केंद्र व राज्यात बसलेले सरकार जबाबदारी घ्यायला तयार नाही. जनतेचे जीवन सुसह्य करण्याची जबाबदार सरकारची नाही का? आपण आता हे बंद केले पाहिजे, या अपमानाच्या विरुद्ध पेटून उठले पाहिजे, असे त्या म्हणाल्या.
शिवरायांचा अवमान...
छत्रपती शिवाजी महाराज यांचा मालवणमधील पुतळा भ्रष्टाचार झाल्याने पडला. शिवरायांचे अरबी समुद्रातील स्मारकाची फक्त कोनशिला ठेवली; परंतु पुढे काहीच झालेले नाही. त्यावरून शिवरायांबद्दल यांच्या मनात किती प्रेम आहे हे दिसून येते, अशी टीकाही त्यांनी केली.
भरघोस बहुमत द्यावे
राज्य सरकारने अडीच वर्षांत काहीही केले नाही. निवडणूक येताच लाडकी बहीणसारख्या योजनांची घोषणा केली. आमचे सरकार येताच आम्ही महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी तीन हजार रुपये दरमहा देणार आहोत. त्यामुळे भरघोस बहुमत द्यावे, असे आवाहनही प्रियांका यांनी केले.
महाराष्ट्र ही संतांची भूमी, या भूमीचा कट्टरतेला विरोध...
प्रियंका यांनी ‘जय शिवाजी, जय भवानी’, ‘साईबाबा की जय’, अशा घोषणा देत भाषणाला सुरुवात केली. प्रारंभी त्यांनी साईबाबांच्या समानतेच्या विचाराची आठवण करून दिली.
त्या म्हणाल्या, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या भूमीने धार्मिक कट्टरतेला सतत विरोध केला. ही भूमी सत्य, समानता व मानवता सांगते. ‘जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले’ ही शिकवण तुकारामांनी या भूमीतून दिली.
जातनिहाय जनगणनेबाबत...
राहुल गांधी हे आरक्षण विरोधी आहेत, असे मोदी बोलतात. मात्र, राहुल गांधी यांनी देशभर चार हजार किलोमीटरची न्याय यात्रा केली, हे ते विसरतात. राहुल गांधी जनतेला न्याय देण्यासाठी आरक्षणाची मर्यादा उठवण्याची व जातनिहाय जनगणनेची मागणी करत आहेत. माझे आव्हान आहे की, पंतप्रधानांनी जातीनिहाय जनगणना करू व आरक्षणाची मर्यादा उठवू हे जाहीर करावे. राज्यात आमचे सरकार आल्यास आम्ही जातनिहाय जनगणना करणार आहोत.