20 फुटांच्या हंडीला लागणार आठ थर, बुटक्यांना मागणी
By Admin | Published: August 18, 2016 03:09 PM2016-08-18T15:09:22+5:302016-08-18T17:24:16+5:30
मुंबईतल्या डोक्याला शॉट मित्र मंडळानं 20 फूटांचीच पण आठ थरांची दहीहंडी आयोजित करण्याचा संकल्प सोडला आहे.
>योगेश मेहेंदळे, ऑनलाइन लोकमत
कोर्टाचा मान ठेवायचा आणि अनादी अनंत कालापासून चालत आलेल्या हिंदू संस्कृतीचं तळहातावरच्या फोडाप्रमाणे रक्षण करायचं या परमउदात्त भावनेतून मुंबईतल्या डोक्याला शॉट मित्र मंडळानं 20 फूटांचीच पण आठ थरांची दहीहंडी आयोजित करण्याचा संकल्प सोडला आहे. 20 फूटांमध्ये सर्वसाधारण उंचीच्या व्यक्तिंचे तीन आणि थोडं ओणवं वगैरे राहून फार फार तर चार थर होतात. मात्र, यामुळे भगवान श्रीकृष्णाच्याही आधीपासून चालत आलेल्या दहीहंडीवर संक्रात येते आणि हिंदूंच्या भावना दुखावल्या जातात त्या वेगळ्या. त्यामुळे, डोक्याला शॉट मित्रमंडळाने, वयानं वाढलेल्या पण उंचीनं खुंटावलेल्या बुटक्यांची दही हंडी आयोजित करण्याचा संकल्प सोडला आहे.
डोक्याला शॉट मित्रमंडळाचे अध्यक्ष रा. ज. फोडरे यांनी सदर प्रतिनिधीशी बोलताना, न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणेच आम्ही दही हंडीचा उत्सव साजरा करणार असल्याचे सांगितले. न्यायालयाने 20 फूट उंचीची आणि गोविंदाचं वय किमान 18 असण्याची अट घातली आहे. याबाबत बोलताना, फोडरे म्हणाले की, वाट्टेल ते झालं तरी हिंदूंची ही परंपरा आम्ही जपणारच, शिवाय न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून रोजगार निर्मितीही करणार.
आपली सर्जनशील विचारशक्ती मांडताना, रा. ज. फोडरे म्हणाले की, तुम्ही बघत असाल की अनेक व्यक्ती 30 - 40 वर्षांच्या होतात, परंतु दोन अडीच फूटांच्या पुढे वाढतच नाहीत. त्यांना बिचाऱ्यांना कामपण मिळत नाही आणि मिळालं तरी ते फार लांब प्रवास करू शकत नाहीत. त्यामुळे अशा बुटक्यांना आम्ही गोविंदा म्हणून निवडणार आहोत. त्यांना चांगलं मानधनही मिळेल, हंडी 20 फूटांची राहील आणि थर पण आठ लागतील असे ते म्हणाले.
परंतु, या बुटक्यांना आठ थर लावता येतील का, या प्रश्नावर फोडरे मिश्किल हसले आणि म्हणाले ती तर आणखी एक गंमत आहे, ज्यामुळे उंच्यापुऱ्या जुन्या गोविंदांनाही मजा येणारे...
ती कशी काय असं विचारल्यावर ते म्हणाले की, "बुटक्यांच्या दर दोन थरांच्या मागे जुन्या गोविंदांचा एक थर चारी बाजुने असेल... बुटक्यांना प्रत्येक थराला टेकू देण्याचं काम हे गोविंदा करतील, तसंच, ते हंडी फोडणार नसल्यामुळे त्यांनी पाच सात थर बाहेरच्या बाहेर लावले तरी न्यायालयाचा आदेश भंग होणार नाही.
तुमच्या या प्रयोगाला पुरेसे मराठी बुटके गोविंदा मिळतील का या प्रश्नावर मात्र, त्यांनी हा केवळ मराठींचा सण नसून हिंदूंचा असल्याचे उत्तर दिले. पण, तरीही पहिली पसंती मराठी बुटक्यांनाच दिली जाईल याची हमी डोक्याला शॉट मित्रमंडळाचे अध्यक्ष रा. ज. फोडरे यांनी दिली आहे.