दोन महिलांसह आठजणांना अटक
By admin | Published: October 23, 2014 10:59 PM2014-10-23T22:59:12+5:302014-10-23T23:06:45+5:30
सांगेली येथे बिबट्याची शिकार : गवसे येथे कातड्याची विक्री करणाऱ्या दोघांना रंगेहाथ पकडले
आजरा : सांगेली (ता. सावंतवाडी) येथे पंधरा दिवसांपूर्वी बिबट्याची शिकार करून त्याची कातडी विक्रीसाठी नेणाऱ्या दोघांना गडहिंग्लज पोलिसांनी गवसे येथे आजरा साखर कारखान्यासमोर रंगेहाथ पकडले. संभाजी रामदास साळुंखे (वय ३२, रा. बुधगाव, ता. मिरज, जि. सांगली) व तानाजी रंगराव पाटील (४५, रा. माणिकवाडी, ता. वाळवा, जि. सांगली) अशी या दोघांची नावे असून, याप्रकरणी पोलिसांनी दोन महिला व तीन शिकाऱ्यांसह आठजणांना अटक केली आहे.
गडहिंग्लजचे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर पाटील यांनी दिलेली माहिती अशी की, पोलीस खबऱ्यांकडून सांगेली (ता. सावंतवाडी) येथे नीलेश राजाराम नार्वेकर (५०), विशाल परशुराम नार्वेकर (२४) व चंद्रकांत भुजू राऊळ (७३) यांनी पंधरा दिवसांपूर्वी बिबट्याची हत्या केली होती. त्याचे कातडे मोहन नानासाहेब देसाई (५०, रा. सुलगाव, ता. आजरा) व आक्काताई जनार्दन सणगर (५५, रा. के. बी. पी. कॉलेजजवळ, इस्लामपूर) या मध्यस्थांतर्फे विक्रीसाठी साळुंखे व पाटील हिरो होंडा मोटारसायकल (एमएच १० बीटी २७०४)वरून घेऊन निघाले होते.
यावेळी गडहिंग्लज पोलिसांनी सापळा रचून साळुंखे व पाटील यांना गवसे येथे रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून बिबट्याची कातडी व दुचाकी जप्त केली आहे. बिबट्याची हत्या करणाऱ्या सांगेली येथील आरोपींनी विनापरवाना वापरलेली १८ हजार रुपयांची सिंगल बार काडतुसी बंदूक आणि काडतुसेही पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. याप्रकरणी पोलिसांनी मध्यस्थ, कातडी विक्रीसाठी नेणारे दोघेजण, सांगेली येथील शिकारी, तेथील अंजली राजाराम नार्वेकर (५०) हिच्यासह एकूण आठजणांना अटक केली आहे. गडहिंग्लज न्यायालयात उभे केले असता संभाजी साळुंखे, तानाजी पाटील, मोहन देसाई यांना एक दिवसाची पोलीस कोठडी, तर उर्वरित आरोपींना न्यायालयीन कोठडी दिली आहे. ही कारवाई गडहिंग्लजचे पोलीस निरीक्षक रामदास इंगवले, उपनिरीक्षक सोमनाथ दिवटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. (प्रतिनिधी)
आजरा पोलीस करतात तरी काय ?
सावंतवाडी-आजरा-सांगली हा मार्ग अवैध वाहतुकीचा मार्ग बनल्याचे गेल्या अनेक दिवसांतील घटनांवरून स्पष्ट झाले आहे. मात्र, यामध्ये स्थानिक आजरा पोलीस कुठेच दिसले नाहीत. कोल्हापूरहून पोलीस निरीक्षक यशवंत केडगे यांनी पकडलेला चरस, तर कधी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडून कारवाई झाली आहे. त्यामुळे आजरा पोलीस करतात तरी काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.