ऐन दिवाळीत राज्यभरात आठ जणांचा बुडून मृत्यू
By admin | Published: October 29, 2016 01:59 AM2016-10-29T01:59:55+5:302016-10-29T01:59:55+5:30
पोहायला गेलेल्या सात किशोरवयीन मुलांसह एका मध्यमवयीन गृहस्थावर काळाने क्रुरपणे घाला घातल्याने ऐन दिवाळीत त्यांच्या घरांत अंध:कार पसरला आहे.
औरंगाबाद/चंद्रपूर : पोहायला गेलेल्या सात किशोरवयीन मुलांसह एका मध्यमवयीन गृहस्थावर काळाने क्रुरपणे घाला घातल्याने ऐन दिवाळीत त्यांच्या घरांत अंध:कार पसरला आहे. शुक्रवारी पाझर तलावात पोहण्यासाठी गेलेल्या औरंगाबादेतील चौघांचा, तर गुरुवारी सायंकाळी नदीपात्रात पोहोयला उतरलेल्या चंद्रपुरातील दोघांचा आणि नागपुरातील पिता-पुत्राचा बुडून मृत्यू झाला.
औरंगाबादेमधील कन्नड तालुक्यातील उंबरखेड गावाजवळच्या आदर्श वसाहतीत राहणारे कृष्णा चरणदास राठोड (१६), उमेश कैैलास पवार (१५), आकाश जयलाल पवार (१५) व रामेश्वर पंडित पवार (१५) हे चौैघे मित्र शुक्रवारी पोहण्यासाठी पाझर तलावावर गेले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने चोघेही बुडू लागले. त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारील शेतात काम करणारे काही लोक धावत आले. कृष्णा व रामेश्वरला बेशुद्धावस्थेत तलावाबाहेर काढून तातडीने कन्नडच्या ग्रामीण रुग्णालयात नेत असतानाच दोघांचाही मृत्यू झाला. तर उमेश व आकाशचे मृतदेह सायंकाळी गावकऱ्यांच्या हाती लागले.
दुसऱ्या घटनेत चंद्रपुरामधील भद्रावती तालुक्यातील माजरी परिसरात वर्धा नदीमध्ये बुडून एवंत पारसनाथ भारती (१६) व जावेद आलमगीर अन्सारी (१७) या मित्रांचा गुरुवारी सायंकाळी मृत्यू
झाला. वाढदिवसाच्या पार्टीनंतर
ते पोहायला उतरले होते.
त्यापैकी एवंतचा मृतदेह शुक्रवारी दुपारी, तर जावेदचा मृतदेह
सायंकाळी सापडला आहे. एवंत यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील शुशगंगा इजिंनिअरिंग कॉलेजचा विद्यार्थी होता, तर जावेद माजरी येथील हिंदी महाविद्यालयात शिकत होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)
मुलासह वडिलांचा नरखेडमध्ये बळी
तिसरी घटना नागपुरातील नरखेड तालुक्यात रोहणा येथे गुरुवारी संध्याकाळी घडली. नदीपात्रात पोहताना अक्षय सुभाष लोलुसरे हा मुलगा बुडाल्याने त्याच्या शोधासाठी पाण्यात उतरलेले त्याचे वडील सुभाष यांचाही बुडून मृत्यू झाला. दोन्ही मृतदेह शुक्रवारी दुपारी बाहेर काढण्यात आले.