‘पद्म’साठी आठ प्रस्ताव
By admin | Published: September 14, 2014 01:12 AM2014-09-14T01:12:28+5:302014-09-14T01:12:28+5:30
देशातील सर्वोच्च नागरी सन्मानापैकी एक ‘पद्मश्री’ पुरस्कारासाठी नागपूर जिल्ह्यातून आठ जणांच्या नावांचा शिफारस प्रस्ताव राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार आहे.
दिवंगत श्रीकांत जिचकार, कवी मधुप पांडेय यांचा समावेश
चंद्रशेखर बोबडे
नागपूर: देशातील सर्वोच्च नागरी सन्मानापैकी एक ‘पद्मश्री’ पुरस्कारासाठी नागपूर जिल्ह्यातून आठ जणांच्या नावांचा शिफारस प्रस्ताव राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. त्यात कवी मधुप पांडेय यांच्या नावाचा समावेश आहे. दिवंगत डॉ. श्रीकांत जिचकार यांच्या नावाची मरणोत्तर सन्मानासाठी शिफारस करण्यात आली आहे.
कला, क्रीडा, साहित्य, शिक्षणासह इतरही सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना पद्म पुरस्काराने गौरविले जाते. राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जातो. यंदा म्हणजे २०१५ च्या पद्म पुरस्कारासाठी जिल्हा पातळीवरून विविध क्षेत्रातील आठ मान्यवरांच्या नावाचे शिफारस प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहेत. त्यात हिंदी साहित्य क्षेत्रातील दिग्गज कवी मधुप पांडे ऊर्फ मधुसुदून अलियास, वैद्यकीय क्षेत्रातून डॉ. विकी रुधवानी, डॉ. लोकेशचंद्र सिंग, साहित्य व शिक्षण क्षेत्रातून डॉ. भाऊसाहेब चावडे, साहित्यिक क्षेत्रातून सय्यद सालेम, साहित्य व शिक्षण क्षेत्रातून डॉ. सुधाकर मोगलेवार, कला क्षेत्रातून तबला वादक प्रशांत गायकवाड आणि सार्वजनिक कार्य आणि शिक्षण क्षेत्रातून दिवंगत डॉ. श्रीकांत जिचकार यांच्या नावाचा समावेश आहे. डॉ. श्रीकांत जिचकार यांच्या नावाची मरणोत्तर पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.
केंद्र सरकारकडून गणतंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला या पुरस्काराची घोषणा केली जाते. मात्र त्याची प्रक्रिया मे महिन्यापासूनच सुरू होते. यंदा त्याला थोडा उशीर झाला आहे. राज्य सरकार जिल्हा पातळीवरून प्रस्ताव मागवते व नंतर ते एकत्रितपणे केंद्र सरकारकडे पाठविते. केंद्र सरकार यावर अंतिम निर्णय घेते. या सर्व मान्यवरांच्या नावांच्या प्रस्तावाला राजकीय नेत्यांच्या शिफारशींचेही पत्र जोडण्यात आले आहे. यापूर्वी नागपूरसह विदर्भातील मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.