विदर्भातील आठ वाघोबा चढणार सह्याद्री डोंगररांगा; वनविभागाचा प्रस्ताव मंजुरीच्या टप्प्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 12:29 PM2023-10-13T12:29:27+5:302023-10-13T12:30:11+5:30
चंद्रपूर, ताडोबामध्ये वाढलेली वाघांची संख्या कमी करण्याचा निर्णय वन मंत्रालयाने घेतला आहे.
सांगली : विदर्भातील ताडोबा, चंद्रपुरातील आठ वाघ सह्याद्री डोंगररांगांत सोडण्यात येणार आहेत. त्याचा प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे चांदोली, कोयनेच्या जंगल प्रक्षेत्रात व कडेकपाऱ्यांत आता बिबट्यांच्या जोडीने वाघोबांचाही संचार होईल. वाघ स्थलांतरासाठी वनविभागाने राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडे परवानगी मागितली. चंद्रपूर, ताडोबामध्ये वाढलेली वाघांची संख्या कमी करण्याचा निर्णय वन मंत्रालयाने घेतला आहे.
सह्याद्रीच्या खोऱ्यात वाघ सोडण्याच्या प्रस्तावानंतर वनविभागाने काही वर्षांपासून तयारी सुरू केली आहे. चांदोलीमध्ये झोळंबी पठारावर सुमारे १० हेक्टर क्षेत्रात गवताळ कुरण विकसित केले. येथे तृणभक्षी प्राण्यांची पैदास सुरू आहे. त्यांची वाढ झाल्यानंतर जंगलात सोडून दिले जाते. या माध्यमातून वाघांसाठी अन्न उपलब्ध होईल, अशी अपेक्षा आहे.
चांदोली, काेयनेत सध्या सात वाघ
- यावर्षी झालेल्या प्राणीगणनेत कोयना व चांदोलीच्या जंगल परिसरात सात वाघ आढळले आहेत.
- वनविभागाच्या कॅमेऱ्यात त्यांची छबी टिपली गेली असून, वाघांची अधिकृत संख्या जाहीर करण्यात आली आहे. हे वाघ स्थायी स्वरूपाचे नाहीत.
- सह्याद्रीच्या कॅरिडॉरमध्ये फिरत राहणारे आहेत. दांडेली-म्हादई-गोवा-दोडामार्ग-चंदगड-राधानगरी-चांदोली-कोयना हे त्यांचे भ्रमण क्षेत्र आहे.