काकाच्या मृत्युस कारणीभूत पुतण्याला आठ वर्षे सक्तमजुरी
By admin | Published: February 27, 2017 08:29 PM2017-02-27T20:29:08+5:302017-02-27T20:29:08+5:30
कळवण तालुक्यातील घटना : मिरचीच्या रोपावरून काका-काकूला मारहाण ; काकाचा मृत्यू
काकाच्या मृत्युस कारणीभूत पुतण्याला आठ वर्षे सक्तमजुरी
कळवण तालुक्यातील घटना : मिरचीच्या रोपावरून काका-काकूला मारहाण ; काकाचा मृत्यू
नाशिक : शेतात मिरचीचे रोप लावण्याच्या कारणावरून काका - काकूला पुतण्याने मोगरीने केलेल्या मारहाणीत काकाचा मृत्यु झाल्याची घटना कळवण तालुक्यातील माळगाव येथे २०१५ ला घडली होती़ जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यात न्यायाधीश एनक़े़ब्रह्मे यांनी आरोपी राजेंद्र भाऊराव गायकवाड (२६, रा़माळगाव, ताक़ळवण, जि़नाशिक) या पुतण्यास मृत्युस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दोषी ठरवत सोमवारी (दि़२७) आठ वर्षे सक्तमजुरी व चौदा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़
कळवण तालुक्यातील माळगाव येथील आरोपी राजेंद्र गायकवाड याचे ८ जानेवारी २०१५ रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास आपले काका गुलाब गायकवाड व काकू रजुबाई गायकवाड यांच्यासोबत शेतात मिरचीचे रोप लावण्याच्या कारणावरून भांडण झाले़ यामध्ये आरोपी राजेंद्र याने काका व काकूलला मोगरीने मारहाण केली़ यामध्ये गंभीर जखमी झालेल्या गुलाब गायकवाड यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला़ या प्रकरणी रजुबाई गायकवाड यांनी पुतण्या राजेंद्र गायकवाडविराधोत कळवण तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती़
नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयात हा खटला सुरू होता़ यामध्ये सरकारी वकील सुधीर कोतवाल यांनी १२ साक्षीदार तपासले़ या साक्षीदारांमध्ये मयत गुलाब गायकवाड यांची पत्नी रजुबाई व व एका नऊ वर्षांच्या मुलीची साक्ष महत्त्वाची ठरली़ न्यायालयाने फिर्यादी व बचाव पक्षाच्या वकीलांचा युक्तीवाद तसेच समोर आलेल्या साक्षी पुराव्यानुसार आरोपी राजेंद्र गायकवाड यास मृत्युस कारणीभूत ठरल्याप्रकरणी भारतीय दंड विधान कलम ३०४(२) अन्वये आठ वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड तर भारतीय दंड विधान कलम ३२४ (धातक हत्याराने इच्छापुर्वक दुखापत करणे) अन्वये दोन वर्षे सक्तमजुरी व चार हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़
न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेत आरोपी राजेंद्र गायकवाड याने काँक्रिट शिक्षा भोगावयाच्या असून दंडाच्या रकमेतील दहा हजार रुपये फिर्यादी रजुबाई गायकवाड यांना देण्यात यावे असे म्हटले आहे़ या खटल्यातील आरोपी राजेंद्र गायकवाड हा घटना घडल्यापासून कारागृहात आहे़(प्रतिनिधी)