Video: एक नारद, शिवसेना गारद... पवारांच्या मुलाखत टीझरवरुन फडणवीसांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2020 12:07 PM2020-07-09T12:07:16+5:302020-07-09T12:08:17+5:30
संजय राऊत यांनी घेतलेल्या शरद पवार यांच्या मुलाखतीचा टीझर ट्विट केला आहे.
मुंबई - राष्ट्रवा्दी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सामनाचे संपादक आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची मुलाखत घेतली आहे. ही मुलाखत ११ जुलैपासून वृत्त वाहिन्यांवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच ही मुलाखत देशाच्या राजकारणात खळबळ माजवेल, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. यावरुन, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता एका व्हाट्सअप एसेमेसचा दाखला देत त्यांनी ‘एक नारद शिवसेना गारद’ अशा शब्दात शिवसेनेसह संजय राऊत यांना टोला लगावला.
संजय राऊत यांनी घेतलेल्या शरद पवार यांच्या मुलाखतीचा टीझर ट्विट केला आहे. त्यामध्ये संजय राऊत यांनी एक शरद, सगळे गारद असं म्हटले आहे. मात्र संजय राऊतांच्या या शब्दांवरुन भाजपाने त्यांना टोला लगावला आहे. यापूर्वी आमदार नितेश राणेंनी संजय राऊत यांच्यासह उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले होते. राऊत म्हणतात एक शरद सगळे गारद, मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पण गारद का, असा सवाल उपस्थित केला. आता, संजय राऊतांच्या या वाक्यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी मिश्किल टीपण्णी केली आहे. संजय राऊत यांची एक मुलाखत घ्या आणि त्याला ‘एक नारद, शिवसेना गारद’ असे नाव द्या अशा संदेश मला व्हाट्सअप आल्याचा चिमटा फडणवीस यांनी काढला. तसेच, सामना हे सध्या बाळासाहेबांचा सामना राहिला नाही. सामना सध्या वाचतंच, कोण? असे म्हणत सामना वर्तमानपत्र आपण वाचत नसल्याचेही फडणवीस यांनी म्हटले.
फडणवीसांचा संजय राऊतांना टोला pic.twitter.com/x71TFTJnr1
— Lokmat (@MiLOKMAT) July 9, 2020
संजय राऊत यांनी आपल्या ट्विटरवर या मुलाखती संदर्भातील व्हिडीओचा टीझर टाकला आहे. 'एक शरद, सगळे गारद!! महाराष्ट्रातील सत्ता बदल हा अपघात होता काय?' असा मथळा असलेला हा व्हिडिओ उत्कंठा वाढवणारा ठरला आहे. शरद पवारांची मुलाखत ऐतिहासिक ठरेल. अशी मुलाखत होणे नाही, असा दावा राऊत यांनी केला. 'शरद पवार यांची मुलाखत घेण्याचं आधीच ठरलं होतं. शरद पवार हे राज्यातील देशातील प्रमुख नेते आहेत. लोकांनी बघितलेले आणि मी पाहिलेले पवार वेगळे आहेत. त्यांच्याविषयी गैरसमज पसरवण्यात आले, बदनामीकारक विधानं केली गेली. जेव्हा पहाटेचा शपथविधी झाला, तेव्हा लोकांनी पवारांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं. पण मी म्हटलं होतं की, शरद पवार सरकार स्थापन करतील. त्यांनी बसलेली खीळ तोडून सरकार स्थापन केलं,' असं राऊत यांनी म्हटलं होतं.