एकवीरा देवीच्या यात्रेस अलोट गर्दी

By Admin | Published: April 4, 2017 01:40 AM2017-04-04T01:40:00+5:302017-04-04T01:40:00+5:30

वेहेरगाव गावातील कार्ला डोंगरावर सोमवारी चैत्र शुद्ध सप्तमीच्या सायंकाळी हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये दिमाखात साजरा झाला.

Ekatra devi yatra all the crowd | एकवीरा देवीच्या यात्रेस अलोट गर्दी

एकवीरा देवीच्या यात्रेस अलोट गर्दी

googlenewsNext

लोणावळा : महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आई एकवीरेचा पालखी मिरवणूक सोहळा वेहेरगाव गावातील कार्ला डोंगरावर सोमवारी चैत्र शुद्ध सप्तमीच्या सायंकाळी हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये दिमाखात साजरा झाला. आई माउलीचा उदं...उदं...एकवीरा माते की जय... या भाविकांच्या घोषणांनी वेहेरगाव गावाचा डोंगर व परिसर दुमदुमला होता. पोलीस प्रशासनाच्या चोख बंदोबस्तामुळे पालखी सोहळा अतिशय शांततेमध्ये पार पडला. आकर्षक रोषणाईमुळे गडाचा परिसर उजाळून निघाला होता.
कोकण परिसरातून मागील काही दिवसांपासून देवीच्या पायी पालख्या गडाकडे येत असल्याने परिसर भाविकांनी गजबजला होता. यात्रेमधील चैत्र शुद्ध षष्ठी, सप्तमी व अष्टमी हे मानाचे दिवस आहेत. यात्रा काळात हजारो भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. दरवर्षीच्या मानाने या वेळी भाविकांची संख्या कमी होती. भाविकांना सहज व सुलभतेने दर्शन व्हावे याकरिता श्री एकवीरा देवस्थान ट्रस्ट व जिल्हा प्रशासनाच्या वतीने तयारी केली होती. भाविकांना देवीचे सुलभतेने दर्शन व्हावे याकरिता देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष माजी आमदार अनंत तरे, उपाध्यक्ष मदन भोई, सचिव व मुख्य पुजारी संजय गोविलकर, खजिनदार नवनाथ देशमुख, विश्वस्त काळुराम देशमुख, विलास कुटे, पार्वती पडवळ, नीलिमा येवले हे गडावर उपस्थित होते. सायंकाळी ७ वाजता देवीची विधीवत आरती झाल्यानंतर ट्रस्टचे अध्यक्ष अनंत तरे, पालखीचे मानकरी चौलचे आग्राव व पेणचे वास्कर तसेच ठाणेकर यांच्यातील प्रत्येकी दहा जणांनी पालखीला खांदा लावला व पालखी मिरवणूक सोहळा सुरू झाला. (वार्ताहर)

Web Title: Ekatra devi yatra all the crowd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.