‘मिसेस वर्ल्ड’ स्पर्धेत अकोल्याची ईलाक्षी तृतीय !
By Admin | Published: December 18, 2015 02:09 AM2015-12-18T02:09:43+5:302015-12-18T02:09:43+5:30
१४ वर्षांनतर मिळाला भारताला बहुमान.
अकोला : चीनमधील बीजिंग येथे 'विन' फाउंडेशनतर्फे आयोजित मिसेस ग्लोब (मिसेस वर्ल्ड) स्पर्धेत अकोल्याच्या डॉ. ईलाक्षी मोरे (गुप्ता) तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली आहे. १४ वर्षांनी भारताला हा बहुमान मिळाला असून, यापूर्वी २00१ मध्ये आदिती गोवित्रीकर यांनी ही स्पर्धा जिंकली होती. ग्लोबल अवॉर्ड फंक्शन फेरीत 'ब्युटी ऑफ एशिया' या पुरस्काराने गौरविण्यात आल्यानंतर डॉ. ईलाक्षी मोरे यांना 'मिसेस एक्सलन्स' फेरीसाठी नामांकन मिळाले होते. या स्पर्धेत जगभरातील ९३ देशांच्या स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. डॉ. ईलाक्षी मोरे या मूळ अकोल्यातील रहिवासी असून, त्या येथील डॉ. शशीकांत मोरे व डॉ. मीनाक्षी मोरे यांच्या कन्या आहेत. डॉ. ईलाक्षी ३ महिन्यांपूर्वी दिल्ली येथे 'मिसेस इंडिया ग्लोब' स्पर्धेत विजेत्या ठरल्या होत्या. बीजिंग येथे झालेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय 'विन' फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. ट्रेसी, नॅशनल ग्लॉब स्पर्धेच्या डायरेक्टर अँना तसेच जगभरातील प्रतिनिधी उपस्थित होते.
*या उत्तराने मिळवून दिल बहूमान !
स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात 'तुमचे सर्वात आवडते फूल कोणते?' असा प्रश्न डॉ. ईलाक्षी यांना विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे उत्तर देत त्यांनी म्हटले की, 'मला कमळाचे फूल सर्वाधिक आवडतं, कारण कमळ चिखलात उगवत असलं तरी त्याचे सौंदर्य कमी होत नाही. सर्व नकारात्मक गोष्टींवर मात करूनही कमळ चिखलात फुलतं. तसेच स्त्रियांनीही आपले स्वप्न मनात न ठेवता पूर्ण विश्वासाने ते पूर्ण करण्यासाठी प्रत्यक्ष कृती करावी.' या उत्तराने त्यांना तृतीय स्थान मिळाले.