एकनाथ आव्हाड यांना ‘साहित्य अकादमी’, विशाखा विश्वनाथ युवा साहित्य पुरस्काराची मानकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 12:07 PM2023-06-24T12:07:11+5:302023-06-24T12:07:19+5:30
आव्हाड यांच्या ‘छंद देई आनंद’ या बालकविता संग्रहासाठी तर विशाखा विश्वनाथ यांच्या ‘स्वतःला स्वतःविरुद्ध उभे करताना’ या कविता संग्रहासाठी हे पुरस्कार जाहीर झाले आहेत.
मुंबई : साहित्य अकादमीच्या बाल आणि युवा साहित्य पुरस्कारांची घोषणा शुक्रवारी नवी दिल्ली येथे करण्यात आली. यंदाच्या वर्षीसाठी मराठी भाषेतील बाल साहित्य पुरस्कार कवी एकनाथ आव्हाड यांना तर युवा पुरस्कार कवयित्री विशाखा विश्वनाथ यांना जाहीर करण्यात आला. आव्हाड यांच्या ‘छंद देई आनंद’ या बालकविता संग्रहासाठी तर विशाखा विश्वनाथ यांच्या ‘स्वतःला स्वतःविरुद्ध उभे करताना’ या
कविता संग्रहासाठी हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. ताम्रपट आणि ५० हजार रुपये असे या दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप आहे.
कोण होते निवड समिती सदस्य?
शुक्रवारी झालेल्या बैठकीत विविध भाषांमधील २२ साहित्यिकांची बाल साहित्य, २० साहित्यिकांची युवा पुरस्कारासाठी निवड केली. डॉ. अक्षयकुमार काळे, बाबा भांड आणि प्रा. डॉ. विलास पाटील हे मराठीसाठी युवा पुरस्कार निवड समितीचे, तर डॉ. कैलास अंभुरे, उमा कुलकर्णी व शफाअत खान हे बाल साहित्य पुरस्कार निवड समितीचे सदस्य होते.
इंजिनीअरिंग ते कॉपी रायटिंग व्हाया कविता
तीस वर्षे मुलांसाठी लिहीत आहे. यापेक्षा तीस वर्षे मलाच मुलांनी लिहितं ठेवलं हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. मुलांसाठी लिहिलेलं मुलांपुढे सादर करताना मनापासून आनंद होतो. मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद माझ्या लिखाणाचा खरा स्रोत आहे, असं मी मानतो.
- एकनाथ आव्हाड
स्वतःशी असलेलं भांडण व स्वतःवरचं प्रेम या दोन टोकांमध्ये माझ्या कवितांचा लोलक सतत दोलायमान होत राहतो. या साऱ्यात कवितेने माझ्यात समजुतीचा स्वर जन्माला घातला आणि तिथपर्यंतचा प्रवास म्हणजे हा संग्रह. - विशाखा विश्वनाथ