भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची खडसेंची घोषणा; मात्र देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने नवा ट्विस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 03:21 PM2024-04-08T15:21:30+5:302024-04-08T15:24:42+5:30

Eknath Khadse: एकनाथ खडसे स्वगृही परतण्यास सज्ज झाले असून त्यांच्या प्रवेशानंतर देवेंद्र फडणवीसांसह इतर नेत्यांकडून कसं स्वागत होतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

eknath Khadse announcement that he will join bjp But a new twist with the statement of Devendra Fadnavis | भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची खडसेंची घोषणा; मात्र देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने नवा ट्विस्ट

भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची खडसेंची घोषणा; मात्र देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने नवा ट्विस्ट

Devendra Fadnavis ( Marathi News ) : पूर्वाश्रमीचे भाजप नेते आणि सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात कार्यरत असणारे एकनाथ खडसे हे पुन्हा स्वगृही परतणार आहेत. खडसे यांनीच दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबतची घोषणा केली. मात्र खडसेंनी भाजपमधून बाहेर पडताना ज्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती आरोप केले होते, ते फडणवीस खडसेंचं पक्षात कसं स्वागत करणार, याबाबत राजकीय वर्तुळात कुतूहल आहे. खडसेंच्या भाजप प्रवेशाविषयी प्रश्न विचारल्यानंतर आज देवेंद्र फडणवीस यांनी आपली पहिली प्रतिक्रिया देत पक्षाने अजून अधिकृतरित्या याबाबत आम्हाला कळवलं नसल्याचं सांगितलं आहे.

एकनाथ खडसेंच्या घरवापसीबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून जर कोणी भाजपमध्ये येत असेल तर आम्ही त्यांना विरोध करण्याचं काही कारण नाही. मात्र पक्षाने अद्याप याबाबत आम्हाला अधिकृतरित्या कळवलं नसून ज्यावेळी पक्षाकडून कळवलं जाईल त्यानंतर आम्ही खडसे यांचे स्वागतच करू," अशी भूमिका फडणवीस यांनी मांडली आहे.

दरम्यान, २०१४ साली राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर फडणवीस आणि खडसे यांच्यामध्ये सुप्त संघर्ष सुरू झाला होता. फडणवीस मुख्यमंत्री असतानाच खडसेंना आपलं मंत्रिपदही गमवावं लागलं होतं. त्यानंतर दोघांमधील दरी वाढतच गेली आणि अखेर खडसेंनी भाजपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता पुन्हा एकदा एकनाथ खडसे स्वगृही परतण्यास सज्ज झाले असून त्यांच्या प्रवेशानंतर देवेंद्र फडणवीसांसह इतर नेत्यांकडून कसं स्वागत होतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

भाजप प्रवेशाविषयी माहिती देताना काय म्हणाले एकनाथ खडसे?

एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेतून आपली पुढील राजकीय दिशा स्पष्ट केली. "माझी भाजपमधील जुन्या नेत्यांशी आणि पदाधिकाऱ्यांसोबत अनेक महिन्यांपासून चर्चा सुरू होती. त्यांचं म्हणणं होतं की मी पुन्हा भाजपमध्ये यायला हवं. मात्र मी याबाबतचा निर्णय घेण्याच्या मानसिकतेत नसल्याचं त्यांना कळवलं होतं. परंतु मी काही दिवसांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली असून त्यांच्याकडे भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली  आणि पुढील १५ दिवसांच्या आत माझा भाजप प्रवेश होईल," अशी माहिती खडसे यांनी दिली आहे.

गिरीश महाजनांचा हल्लाबोल सुरूच

एकनाथ खडसे यांचा भाजपचे जळगाव जिल्ह्यातील महत्त्वाचे नेते असलेल्या गिरीश महाजनांसोबत मागील काही वर्षांपासून टोकदार राजकीय संघर्ष सुरू आहे. अशातच नुकतीच खडसे यांनी भाजप प्रवेशाची घोषणा केल्यानंतर महाजन यांनी शेलक्या शब्दांत त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. "खडसेंकडे गावातील ग्रामपंचायतही नाही. त्यांच्या पत्नीचा पराभव झालाय, विधानसभा निवडणुकीत त्यांची मुलगीही पराभूत झाली आहे, बँकची सत्ताही गेली, आता त्यांच्याकडे काय राहिले आहे?  जो दिवा विझलेला आहे, त्यांच्याबद्दल तुम्ही एवढं का विचारता?" असा सवाल महाजन यांनी केला.

Web Title: eknath Khadse announcement that he will join bjp But a new twist with the statement of Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.