“रक्षा खडसे गेल्या वेळेपेक्षा अधिक मतांनी निवडून येतील”; नाथाभाऊंनी दिला आशिर्वाद
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 05:07 PM2024-04-25T17:07:22+5:302024-04-25T17:07:42+5:30
Eknath Khadse News: या मतदारसंघात रक्षा खडसे यांनी उत्तम काम केले आहे, असे कौतुकोद्गार एकनाथ खडसे यांनी काढले.
Eknath Khadse News: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आपण पुन्हा एकदा भाजपामध्ये परत जाणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, अद्यापही एकनाथ खडसे यांचा भाजपा प्रवेशाचा मुहूर्त ठरलेला नसल्याचे सांगितले जात आहे. एकनाथ खडसे यांनी जाहीर करूनही प्रवेशाबाबत होणाऱ्या विलंबामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे सांगितले जात आहे.
भाजपाकडून पुन्हा एकदा रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रक्षा खडसे यांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांनी मीडियाशी बोलताना आपल्या भावना स्पष्ट शब्दांत व्यक्त केल्या. तसेच रक्षा खडसे पुन्हा एकदा अधिक मतांनी निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला.
रक्षा खडसे गेल्या वेळेपेक्षा अधिक मतांनी निवडून येतील
भाजपामध्ये अजून प्रवेश केलेला नाही. त्यामुळे रक्षा खडसे उमेदवारी अर्ज भरताना मी तिथे उपस्थित राहण्याचा प्रश्न येत नाही. पंरतु, गेली १० वर्षे रक्षा खडसे संसदेत प्रतिनिधित्व करत आहेत. या मतदारसंघात रक्षा खडसे यांनी उत्तम काम केले आहे. इतक्या लहान वयात इतकी उत्कृष्ट कामगिरी करण्यात त्यांचा वरचा क्रमांक आहे. कमी वयात तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीची उमेदवारी भाजपाच्या वरिष्ठांनी दिली. तसेच राज्यातील नेत्यांच्या सहकार्यामुळे ती मिळाली. त्यामुळे निश्चितच या लोकसभेतही रक्षा खडसे यांचा विजय होईल, असा माझा विश्वास आहे. आतापर्यंत केलेल्या कामगिरीच्या बळावर आणि कार्यकर्त्यांच्या तसेच मतदारांच्या आशिर्वादाने रक्षा खडसे गेल्या वेळेपेक्षा मिळालेल्या मताधिक्क्यापेक्षा अधिक मतांनी विजयी होतील, असे एकनाथ खडसे यांनी सांगितले.
दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया करण्यापूर्वी रक्षा खडसे यांनी एकनाथ खडसे यांची भेट घेऊन त्यांचे आशिर्वाद घेतले. यावर, माझी मुलगी असून, विजयाचा आशिर्वाद देणे न देणे यापेक्षा ती विजयी होईलच, असा विश्वास बाळगणे महत्त्वाचे आहे. रक्षा खडसे यांच्यासाठी कोणताही डमी अर्ज भरलेला नाही. कारण भाजपामध्ये अजून माझा प्रवेश झालेला नाही. मी पक्षाच्या आदेशाप्रमाणे काम करणारा माणूस आहे, असे एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले.