"एकनाथ खडसे हे सरपटणारे, रंग बदलणारे...", चंद्रकांत पाटलांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 12:57 PM2024-09-03T12:57:00+5:302024-09-03T13:53:26+5:30
अजून एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाला मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे एकनाथ खडसे यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचेच काम करण्याचे संकेत दिले आहेत.
गेल्या काही महिन्यांपूर्वी एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातून पुन्हा एकदा भाजपमध्ये घरवापसी करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी लोकसभा निवडणुकीपूर्वी एकनाथ खडसे यांनी दिल्लीत जाऊन भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. तसेच, लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार रक्षा खडसे यांचा प्रचार केला होता. तरीही, अद्याप एकनाथ खडसे हे भाजपमध्ये सामील झाले नाहीत. त्यामुळे एकनाथ खडसे कोणत्या पक्षात आहेत? असा प्रश्न उपस्थित झाला. यावर एकनाथ खडसे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. भाजपमध्ये माझा प्रवेश झाला, पण घोषणा झालेली नाही. काही दिवस वाट पाहीन आणि राष्ट्रवादीमध्ये पुन्हा सक्रिय होईन, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.
मुक्ताईनगरमधील शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्या भाजप पक्षप्रवेशावर प्रतिक्रिया देत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. 'हे रंग बदलणारे सरपटणारे प्राणी आहेत' अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसेंवर टीका केली. तसेच, एकनाथ खडसेंच कुटुंबच संभ्रमात टाकणारं आहे, आज राष्ट्रवादी आणि उद्या भाजपमध्ये. आधी सुनेला लोकसभेत पोहोचवलं, त्यानंतर आता मुलीसाठी सोयीस्करपणे राजकारण करणारे खडसे आहेत. एकनाथ खडसे हे स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण करणारे आहेत. गेल्या ३० वर्षात एकनाथ खडसेंनी कुठलाही विकास मतदारसंघात केला नाही, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.
दरम्यान, काल (दि.२) एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावमध्ये बॅनर झळकले होते. या बॅनरवर शरद पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे फोटो दिसून आले. त्यामुळे एकनाथ खडसे नेमकं कोणत्या पक्षात आहेत? असा प्रश्न उपस्थित झाला. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागून दोन महिन्यापेक्षा जास्त काळ लोटला आहे. पण अजून एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाला मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे एकनाथ खडसे यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचेच काम करण्याचे संकेत दिले आहेत. भाजपमध्ये माझा प्रवेश झाला, पण घोषणा झालेली नाही. काही दिवस वाट पाहीन आणि राष्ट्रवादीमध्ये सक्रिय होईन, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले.
काय म्हणाले होते एकनाथ खडसे?
"भाजपमध्ये माझा प्रवेश करण्यात यावा, अशी विनंती मी भाजपकडे केली होती. मात्र, भाजपकडून पूर्ण प्रतिसाद मिळाला नाही. मी अजूनही राष्ट्रवादीचा आमदार आहे आणि शरद पवार यांनी मला राजीनामा देण्यास नकार दिला आहे. मी भाजपकडून प्रतिसादाची अजून काही दिवस वाट पाहील आणि नंतर माझ्या मूळ राष्ट्रवादीमध्ये सक्रिय होणार आहे. जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये माझा भाजपमध्ये प्रवेश करण्यात आला. पण, त्याला खाली विरोध झाल्याने तो जाहीर होऊ शकला नाही. त्यामुळे आता भाजपमध्ये राहणे उचित होणार नाही," असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.