खडसे काँग्रेसमध्ये जावळेंची बॅग घेऊन फिरायचे, भाजपात आले आमदार झाले; महाजनांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 11:15 AM2024-03-20T11:15:27+5:302024-03-20T11:16:02+5:30
तुम्ही तुमचा उमेदवार उभा करा. तुमची किती ताकद आहे हे जिल्ह्याला दाखवा. सोयीचे राजकारण करू नका, असे आव्हान महाजन यांनी खडसेंना दिले.
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या सुनेला भाजपाने खासदारकीचे तिकीट दिल्याने महाविकास आघाडीची गोची झाली आहे. गिरीश महाजन यांच्यावर खडसे नेहमी जहरी टीका करतात. यावर महाजन यांनी जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे. एकनाथ खडसे हे काँग्रेसमध्ये काम करत होते, तेव्हा हरिभाऊ जावळे यांची बॅग घेऊन फिरताना मी बघितलेले आहे. त्यांनी दगडा खाल्ले प्रतिकूल परिस्थितीत काम केले असे काही नाहीय, अशा शब्दांत महाजन यांनी खडसेंवर टीका केली आहे.
1990 मध्ये भाजपकडून विधानसभेचे तिकीट मिळाले आणि ते निवडून आले. या गोष्टीचा मी साक्षीदार आहे. सरकारमध्ये आल्यानंतर सर्वात जास्त खाती त्यांनाच मिळाली. कोणता वाईट काळ त्यांनी बघितला आहे. तुम्ही पक्षप्रवेश घेतल्यानंतर पहिल्यांदा निवडून आले हे तुम्ही विसरू नका. खडसेंचा हा स्वार्थीपणा आहे त्यांनी कोणाला शिकवू नये. टाळूवरचे लोणी खायला आले आहेत आणि ते आम्हाला शिकवणार आहेत का? असा सवाल महाजन यांनी विचारला.
तसेच रक्षा खडसे आणि स्मिता वाघ या दोघांना उमेदवार म्हणून घोषित करण्यात आल आहे. जळगाव जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघातील उमेदवार बदलाबाबत कुठलीही चर्चा नाही किंवा आमची मागणी ही नाहीय, असे महाजन यांनी स्पष्ट केले.
आम्हाला कुणाच्या आशीर्वादाची गरज नाही. तुम्ही तुमच्या पक्षाचे काम करा. तिकडे किती मते पडतात ते दाखवा. असा डबल गेम करायचा नाही. आता तुम्ही सांगितले की मी राष्ट्रवादी शरद पवार गट आहे तर तुम्ही तुमचा उमेदवार उभा करा. तुमची किती ताकद आहे हे जिल्ह्याला दाखवा. सोयीचे राजकारण करू नका, असे आव्हान महाजन यांनी खडसेंना दिले.
एकनाथ खडसेंनी निवडणुकीतून माघार घेतल्यावरू देखील महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी त्यांच्यासोबत काम केले आहे. त्यांची काय ताकद होती ते मला माहित आहे. पक्षासोबत होते म्हणून त्यांची ताकत होती, आता पक्ष सोडला आता त्यांचे काय राहिल आहे. त्यांच्या गावातली सात लोकांची ग्रामपंचायत सुद्धा त्यांची नाही. जिल्हा बँक त्यांची नाही. जिल्हा दूध संघ त्यांच्याकडे नाही. त्यांच्या मुलीला ते त्यांच्या मतदारसंघातून निवडून आणू शकत नाही, असा टोलाही महाजन यांनी लगावला. माझ्यामुळे सर्व काही आहे हा समज त्यांचा आता दूर झाला असेल, असेही महाजन म्हणाले.