खडसेंच्या राज्यसभेच्या वर्णीसाठी अडथळा ठरतोय 'घराणेशाही'चा मुद्दा ?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2020 05:42 PM2020-03-09T17:42:43+5:302020-03-09T17:44:23+5:30

महाराष्ट्राच्या कोट्यातून राज्यसभेवर गेलेल्या सात खासदारांचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात संपत आहे.

Eknath Khadse many obstacles for Rajya Sabha | खडसेंच्या राज्यसभेच्या वर्णीसाठी अडथळा ठरतोय 'घराणेशाही'चा मुद्दा ?

खडसेंच्या राज्यसभेच्या वर्णीसाठी अडथळा ठरतोय 'घराणेशाही'चा मुद्दा ?

googlenewsNext

मुंबई : राज्यसभेसाठी भाजपकडून जेष्ठ आणि नाराज नेते एकनाथ खडसे यांची वर्णी लागणार असल्याच्या चर्चेला वेग आला आहे. मात्र दुसरीकडे दिल्लीतील पक्षश्रेष्ठीं खडसे यांना राज्यसभेवर घेण्यासाठी उत्सुक नसल्याचे सुद्धा बोलले जात आहे. एकाच घरात लोकसभा आणि राज्यसभा सदस्य दिल्यामुळे घराणेशाहीचा आरोप पक्षावर होण्याची शक्यता असल्याने पक्षाकडून खबरदारी घेतली जात असल्याची चर्चा आहे.

महाराष्ट्राच्या कोट्यातून राज्यसभेवर गेलेल्या सात खासदारांचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात संपत आहे. त्यामुळे या जागेवर लवकरच निवडणूक होणार आहे. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून नाराज असलेल्या खडसेंना राज्यसभेचे तिकीट दिले जाणार असल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले, माजी खासदार उदयनराजे भोसले यांचे नावही चर्चेत आहे.

मात्र असे असले तरीही, दिल्लीतील पक्षश्रेष्ठींचा खडसेंना विधान परिषेदवर संधी देण्यावर जोर आहे. कारण खडसे यांच्या सून रक्षा खडसे या लोकसभेच्या खासदार आहेत. त्यामुळे खडसे यांना राज्यसभेवर घेतले तर पहिल्यांदाच सून लोकसभेत आणि सासरा राज्यसभेवर असल्याची राजकरणात ऐतिहासिक नोंद होईल. तसेच विरोधकांवर 'घराणेशाही'चा आरोप करणाऱ्या भाजपवर सुद्धा याच मुद्यावरून प्रश्न चिन्ह उपस्थित केली जातील. त्यामुळे खडसेंच्या राज्यसभेच्या वर्णीसाठी 'घराणेशाही'चा मुद्दा अडथळा ठरत असल्याचे बोलले जात आहे.

त्याचबरोबर विधान परिषेदवर खडसे यांना घेण्यासाठी माजी मुख्यमंत्री तथा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा विरोध असल्याचेही बोलले जात आहे. त्यात खडसे सुद्धा विरोधी पक्षनेते पद दिले तरच विधान परिषेदवर जाण्यास तयार होतील अशीही चर्चा आहे. कारण सद्या विरोधी पक्षनेते असलेले प्रवीण दरेकर हे खडसेंच्या तुलनेत बरेच ज्युनिअर असल्याने, त्यांच्या हाताखाली काम करण्यास खडसे तयार होणार नाही. त्यामुळे एकनाथ खडसे यांची नाराजी भाजप कशी दूर करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


 

Web Title: Eknath Khadse many obstacles for Rajya Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.