एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर?; नागपुरात शरद पवारांची भेट घेण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 08:36 PM2019-12-17T20:36:13+5:302019-12-17T20:36:41+5:30
ज्या पद्धतीने मुंडे साहेबांवर आरोप झाले तसे माझ्यावर झाले. ज्यांच्यामुळे तुम्ही मुख्यमंत्री झालात, मंत्री झाला मग त्यांना काढण्याचं काम का केलं?
नागपूर - गेल्या अनेक दिवसांपासून भाजपावर नाराज असलेले एकनाथ खडसे नागपुरात दाखल झालेले आहेत. तसेच विदर्भ दौऱ्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारदेखील नागपुरात आहेत. संध्याकाळी शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक घेतली. त्यामुळे एकनाथ खडसे नागपुरात शरद पवारांची भेट घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
एकनाथ खडसे भाजपातील ज्येष्ठ नेते आहेत. गेल्या ४५ वर्षाहून अधिक काळ ते भाजपात सक्रिय आहेत. मात्र गेल्या ५ वर्षात खडसे पक्ष नेतृत्वावर नाराज आहेत. पक्षासाठी इतका संघर्ष करुनही माझ्यावर अन्याय झाला अशी भावना एकनाथ खडसेंनी वारंवार बोलून दाखविली आहे. याच पार्श्वभूमीवर अनेकदा एकनाथ खडसे पक्ष सोडणार अशी चर्चा सुरु होती. पण खडसेंनी या अफवा असल्याचं म्हटलं होतं.
मात्र गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त परळीत घेण्यात आलेल्या मेळाव्यात एकनाथ खडसेंनी जाहीर व्यासपीठावरुन आपली नाराजी व्यक्त केली होती. शेठजी, भटजी पक्ष म्हणून भाजपाची ओळख होती. त्याला बहुजनाचा चेहरा देण्याचं काम गोपीनाथ मुंडे यांनी केलं. ज्यांनी ४० वर्ष पक्षासाठी झटलो त्यांना अशी वागणूक का? आम्ही बाहेर पडत नाही तर आम्हाला तसं करण्यासाठी प्रवृत्त केलं जात आहे. वरवर गोड बोलतात आणि पक्ष सोडून गेलं पाहिजे असं वागतात असा आरोप एकनाथ खडसेंनी नाव न घेता देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला होता.
तसेच ज्या पद्धतीने मुंडे साहेबांवर आरोप झाले तसे माझ्यावर झाले. ज्यांच्यामुळे तुम्ही मुख्यमंत्री झालात, मंत्री झाला मग त्यांना काढण्याचं काम का केलं? जे गोपीनाथ मुंडे यांनी सहन केलं ते आम्ही सहन करत आहोत. मग किती दिवस हे सहन करायचं? पुढे काय करायचं? हे तुम्ही सांगा असं उपस्थित जनतेलं त्यांनी विचारलं होतं.
यावर एकनाथ खडसेंना तिकीट नाकारण्याचा निर्णय दिल्लीतून झाला. त्यांचं तिकीट का कापण्यात आलं, याबद्दल मला कल्पना नाही. केंद्रीय नेतृत्त्वच त्यांना यामागील कारणं सांगू शकतं. त्यावर मी भाष्य करणं योग्य ठरणार नाही, असं फडणवीस यांनी म्हटलं होतं. तसेच एकनाथ खडसेंनी ज्या पद्धतीनं भाषण केलं, तसं ते बोलले नसते तर बरं झालं असतं असं त्यांनी सांगितले होतं. दरम्यान खडसेंच्या भाषणावर केंद्रीय नेतृत्व नाराज असल्याचं सांगितलं जातं होतं त्यामुळे खडसेंवर कारवाई होणार अशी चर्चा होती. मात्र तत्पूर्वी एकनाथ खडसे भाजपाला रामराम करणार का? हे पाहणं गरजेचे आहे.