एकनाथ खडसेंनी सांगितलं उद्धव ठाकरेंच्या भेटीमागचं कारण, राजकीय तर्कवितर्कांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 07:51 PM2019-12-10T19:51:57+5:302019-12-10T19:52:25+5:30

गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे भाजपात असंतुष्ट असल्याची चर्चा आहे.

Eknath Khadse meet uddhav thackeray in vidhan bhawan | एकनाथ खडसेंनी सांगितलं उद्धव ठाकरेंच्या भेटीमागचं कारण, राजकीय तर्कवितर्कांना उधाण

एकनाथ खडसेंनी सांगितलं उद्धव ठाकरेंच्या भेटीमागचं कारण, राजकीय तर्कवितर्कांना उधाण

googlenewsNext

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे भाजपात असंतुष्ट असल्याची चर्चा आहे. ओबीसी नेत्यांवर अन्याय होत असल्याचं खडसेंनी वारंवार पक्षनेतृत्वाकडे सांगत नाराजी व्यक्त केली आहे. एकनाथ खडसे काल दिल्लीत गेले असता भाजपाच्या वरिष्ठांनी भेट न दिल्यानं ते थेट शरद पवारांच्या भेटीला गेले. त्यामुळे खडसे राष्ट्रवादीत तर जाणार नाहीत ना, अशी चर्चाही सुरू झाली. पंकजा मुंडेंची आज भेट घेतल्यानंतर खडसे थेट उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी विधान भवनात दाखल झाले. काल शरद पवार, आज पंकजा मुंडे आणि आता उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानं खडसेंच्या मनात नेमकं काय सुरू आहे, याचा कोणालाही थांगपत्ता लागत नाहीये. आता खडसे शिवसेनेत जाणार असल्याचीही चर्चा जोर धरू लागली आहे. उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर खडसेंनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला आहे. ते म्हणाले,  काल दिल्ली येथे शरद पवारांशी माझी अर्धा तास चर्चा झाली. माझ्या मतदारसंघातील शेळगाव बॅरेज व बोदवड उपसा सिंचन योजनेला केंद्रीय जलआयोगानं कालच मान्यता दिली. त्यासाठी मला मंत्रिमंडळाच्या शिफारशीची गरज आहे, ती शिफारस मिळवून देण्यासाठी पवार साहेबांनी तातडीनं मदत करावी, अशी विनंती करण्यासाठी मी त्यांच्याकडे गेलो होतो. पवारसाहेबांकडे जी मागणी केली तीच उद्धव ठाकरेंकडे केली. आमच्या दोन्ही प्रकल्पांना साडेसहा हजार कोटी लागणार आहेत. केंद्र सरकार यासाठी पैसा उपलब्ध करून द्यायला तयार आहे. फक्त आपण शिफारस केल्यास त्याला गती मिळू शकेल, असं उद्धव ठाकरेंना सांगितलं आहे.

परवा 12 तारखेला परळी-वैजनाथ येथे म्हणजेच  गोपीनाथ गडावर पंकजा मुंडेंनी स्वाभिमान मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. दरवर्षी या मेळाव्याला मुंडे साहेब असताना जात असतो. आताही आम्ही सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहोत. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचं स्मारक औरंगाबादला उभं करावं, यासाठी औरंगाबादला पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागाची जी जागा आहे. मंत्री असताना त्या ठिकाणी मी त्यांना ती उपलब्ध करून दिलेली आहे. पण मंत्रिमंडळातून मी बाहेर आल्यानंतर त्या ठिकाणी गोपीनाथ मुंडेंचं स्मारक उभं राहू शकलेलं नाही.  30 ते 40 कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे.

मी नाराज आहे ही बातमी चुकीची आहे. माझी मनधरणी करण्यासाठी मुनगंटीवार आणि तावडे आलेत, यात फारसं काही तथ्य नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेतल्या अनेक नेत्यांशी आमची जवळीक आहे. त्यामुळे अनेक पक्षांना वाटतं 40-42 वर्षांचा अनुभव असलेला नेता पक्षात आल्यास पक्षाला बळकटी येऊ शकेल. त्यात काहीही गैर नाही, पण याबाबत मी कुठलाही निर्णय घेतलेला नाही, असंही खडसेंनी स्पष्ट केलेलं आहेत.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून अनेक दिग्गज नेत्यांना तिकीट नाकारण्यात आलं. खडसे यांच्यासह तावडे आणि प्रकाश मेहता यांना डावलल्यानं भाजपांतर्गत धुसफूस आता समोर येऊ लागली आहे. तर भाजपाच्या काही नेत्यांनी पक्षविरोधी काम केल्यानं पंकजा मुंडे, रोहिणी खडसे यांचा पराभव झाल्याचाही आरोप खडसेंनी केला होता. विशेष म्हणजे पंकजा मुंडे यांनी देखील आपली नाराजी फेसबुकच्या माध्यमातून व्यक्त केली होती. त्यानंतर भाजपामध्ये ओबीसी नेत्यांना बाजूला केले जात असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली. तोच ओबीसींचा नाराज असलेला गट तयार करण्याचा खडसे प्रयत्न करत असून, भाजपावर दबाव वाढवण्यासाठी हे सर्व केलं जात असल्याची चर्चा आहे. 
दरम्यान खडसे शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे सांगण्यात येत होते. तर काँग्रेसकडून त्यांना ऑफर देण्यात आली आहे. आता पुन्हा एकदा खडसे यांच्या पक्षांतराच्या चर्चांनी जोर धरला आहे. विनोद तावडे, मुनगंटीवार आणि भुपेंद्र यादव यांच्यावर खडसेंची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे खडसे नेमकी काय भूमिका घेतात हे येत्या काळात समजणार आहे.  
 

Web Title: Eknath Khadse meet uddhav thackeray in vidhan bhawan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.