Eknath khadse : "हम तो डुबेंगे सनम, तुमको भी साथ लेकर डुबेंगे"; एकनाथ खडसेंचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 11:52 AM2022-08-08T11:52:32+5:302022-08-08T12:10:26+5:30
Eknath khadse : "नाथाभाऊंच्या मागे ईडी लागली, सीबीआय लागली, अँटी करप्शन लागली, एटीएस लागलं... काय काय लागलं, काहीच शिल्लक राहिलं नाही. यांना फक्त नाथाभाऊच दिसतो."
एकनाथ खडसे (Eknath khadse) यांनी त्यांच्यावर टीका करणाऱ्यांवर आता जोरदार निशाणा साधला आहे. "हम तो डुबेंगे सनम, तुमको भी साथ लेकर डुबेंगे" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. "आडवी उभी काहीतरी स्टोरी रचायची आणि त्याच्या माध्यमातून अडकवण्याचा प्रयत्न करायचा असे जे प्रकार होत आहेत ते निषेधार्ह आहेत" असं म्हटलं आहे. तसेच "कोणी म्हणतं तुरुंगात जायचंय, जायचंय तुरुंगात तर तुरुंगात जाईन. माझं नेहमीच असं होतं की, "हम तो डुबेंगे सनम, तुमको भी साथ लेकर डुबेंगे"" असं देखील एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.
"ईडी नावाचा प्रकार हा आता घरोघरी पोहोचला आहे. नाथाभाऊंच्या मागे ईडी लागली, सीबीआय लागली, अँटी करप्शन लागली, एटीएस लागलं... काय काय लागलं, काहीच शिल्लक राहिलं नाही. यांना फक्त नाथाभाऊच दिसतो. जे व्हायचं ते होईल आपला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. पण तुम्हाला, कार्यकर्त्यांना सांगतो की, नाथाभाऊंनी येथे 40 वर्षे काम केलं आहे" असं देखील एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. जळगावातील एका कार्यक्रमात ते बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यानंतर आता एकनाथ खडसेंनी बंडखोरांवर बोचरी टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या तब्बल ४० आमदारांसह बंडखोरी केल्यानंतर या आमदारांवर विविध आरोप करण्यात आले. बंडखोरीसाठी या आमदारांना प्रत्येकी 50 कोटी रुपये देण्यात आल्याचा दावा महाविकास आघाडीतील काही नेत्यांकडून करण्यात आला होता. याच दाव्याचा पुनरुच्चार करत एकनाथ खडसे यांनी बंडखोरांवर खरमरीत शब्दांत निशाणा साधला आहे.
यांच्या बापजाद्याने कधी 50 खोके पाहिले नसतील. तुम्हाला काय हाटील, काय झाडी जे काही बघायचे असेल ते बघा. मात्र जनतेला वाऱ्यावर सोडू नका, असा टोला एकनाथ खडसे यांनी लगावला. एक मुख्यमंत्री तर दुसरा बिनखात्याचा उपमुख्यमंत्री आहे. मंत्रिमंडळ विस्तारावरून गेल्या ३७ दिवसांपासून सरकारचा पोरखेळपणा सुरू आहे, अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली.