"माझा परिवार दुखावला, मुलगी रडत होती, सुनेलाही धक्का बसला"; मुलावरून एकनाथ खडसे भावूक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 01:28 PM2022-11-22T13:28:15+5:302022-11-22T13:28:29+5:30
Eknath Khadse Slams Girish Mahajan : एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजनांनी केलेल्या विधानावर नाराजी व्यक्त केली आहे. "माझा परिवार दुखावला आहे. माझी मुलगी रडत होती. सुनेलाही धक्का बसला आहे" असं म्हणत खडसे भावूक झाले आहेत.
माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि विद्यमान मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यातील शाब्दिक युद्ध संपताना दिसत नाही. जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीवरून महाजन-खडसे वाद पुन्हा उफाळून आला. हा वाद इतक्या टोकाला पोहचला की आता एकनाथ खडसेंच्या मुलाचं नेमकं काय झालं? ही हत्या होती की आत्महत्या हादेखील संशोधनाचा विषय आहे असं म्हणत मंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंना डिवचलं आहे. त्यामुळे आता या दोन्ही नेत्यांचा वाद वैयक्तिक पातळीवर पोहचल्याचं दिसून येत आहे.
एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजनांनी केलेल्या विधानावर नाराजी व्यक्त केली आहे. "माझा परिवार दुखावला आहे. माझी मुलगी रडत होती. सुनेलाही धक्का बसला आहे" असं म्हणत खडसे भावूक झाले आहेत. "मला आता जास्त काही बोलायचं नाही. मला फार वेदना होत आहेत. माझा परिवार दुखावला आहे. माझी मुलगी रडत होती. सुनेलाही धक्का बसला आहे. माझ्या मित्रपरिवारातून साधारण 60 ते 70 फोन हे तीन-चार तासांत आले आहेत. त्यांनीही गिरीश महाजन यांच्या या विधानाचा निषेध केला आहे. आमच्या सर्वांच्याच भावना दुखावल्या आहेत" अशा भावना खडसे यांनी व्यक्त केल्या.
"गिरीश महाजन यांना रक्षावर संशय आहे का?"
गिरीश महाजनांनी अत्यंत नीच व हलकट प्रवृत्तीने अशा स्वरूपाचे प्रश्न उपस्थित केले असून माझ्या मुलाने आत्महत्या केली त्यावेळी मी इथे नव्हतो. मग गिरीश महाजन यांना रक्षावर संशय आहे का? असा सवाल उपस्थित केला. आमच्या परिवारावर संशय घेण्याचा प्रयत्न गिरीश महाजन यांनी केला असल्याचे खडसे यांनी म्हटले. गिरीश महाजन यांना सत्तेचा माज व सत्तेची मस्ती असून जनता मात्र ही मस्ती उतरल्याशिवाय राहणार नाही, अशी टीकाही एकनाथ खडसेंनी केली आहे.
"मी अनेक कृत्ये उघड्या डोळ्यांनी पाहिली"
एकनाथ खडसे यांच्या मुलाच्या मृत्यूबाबत अनेक वर्षानंतर गिरीश महाजन यांनी या प्रकरणी आरोप केला आहे. मात्र या मागचे कारण गिरीश महाजन यांनाच माहिती असून त्यांनी फर्दापूरच्या गेस्टहाऊसवर काय भानगड झाली होती, त्यावेळी मी देखील त्या गेस्टहाऊसवर होतो. मी अनेक कृत्ये उघड्या डोळ्यांनी पाहिली आहेत. तेव्हा पेपरमध्ये चवीने छापून येत होते. मी त्यावर काही बोललो नाही. गिरीश महाजन यांचे अनेक महिलांशी प्रेम संबंध आहेत. मात्र याचा कधी उल्लेख मी केला नाही. एखाद्याचे प्रेमसंबंध असू शकतात, असा टोला खडसे यांनी लगावला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"