एकनाथ खडसे हे भाजपात फार काळ राहणार नाहीत - संजय राऊत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 01:10 AM2018-01-12T01:10:03+5:302018-01-12T01:10:27+5:30
माजी मंत्री एकनाथ खडसे हे भाजपात फार काळ राहणार नाहीत, तसेच राहुल गांधी भविष्यातील देशाचे नेते असतील, असे सूचक वक्तव्य शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी येथे पत्रकार परिषदेत केले.
जळगाव : माजी मंत्री एकनाथ खडसे हे भाजपात फार काळ राहणार नाहीत, तसेच राहुल गांधी भविष्यातील देशाचे नेते असतील, असे सूचक वक्तव्य शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी येथे पत्रकार परिषदेत केले.
खडसे यांचा विषय भाजपाच्या दृष्टीने संपला असल्याचे सांगत राऊत म्हणाले, खडसे हे भाजपातून बाहेर पडणार हे निश्चित आहे. मात्र ते कोणत्या पक्षात जातील हे सांगता येत नाही. सध्या ते अजित पवार यांच्या कानात जास्त बोलू लागले आहेत. आणि पवारही त्यांना टाळ्या देवू लागले आहे.
खडसेंना शिवसेनेत घेणार का, यावर राऊत म्हणाले, शिवसेना आणि भाजपा युती ही खडसेंच्या तोंडूनच तुटली. मात्र शिवसेना संपविण्याचा ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केला ते स्वत:च संपले हा आजपर्यंतचा इतिहास आहे. तरी देखील आम्हाला त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे. ते शिवसेनेत येण्यास उत्सुक असल्यास पक्षप्रमुखांशी चर्चेनंतरच निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गुजरात निवडणुकीत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची नेतृत्व क्षमता चांगली दिसून आली. ते भविष्यातील देशाचे नेते आहेत. गुजरातमध्ये भाजपाचा विजय हा अपमानास्पद विजय आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५० सभा घेतल्या. सर्व शक्ती लावली तरी देखील काठावर विजय मिळाला. अहंकारी पक्षांसाठी गुजरातची निवडणूक ही धोक्याची घंटा आहे, असेही ते म्हणाले.