एकनाथ खडसेंना परदेशातून धमकी? पोलिसांकडे तक्रार, आफ्रिकेतून आला फोन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 04:43 AM2017-10-17T04:43:21+5:302017-10-17T04:44:10+5:30
सोमवारी पहाटे आपणास मोबाइलवरून ‘संभालके रहना’ अशी धमकी देण्यात आल्याची तक्रार भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पोलिसांकडे केली आहे. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीनुसार तो कॉल आफ्रिकेतील बुरुंडी या देशातून आल्याचे निष्पन्न झाल्याची
जळगाव : सोमवारी पहाटे आपणास मोबाइलवरून ‘संभालके रहना’ अशी धमकी देण्यात आल्याची तक्रार भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा
माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पोलिसांकडे केली आहे. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीनुसार तो कॉल आफ्रिकेतील बुरुंडी या देशातून आल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी ‘लोकमत’ला दिली.
सोमवारी पहाटे ५.४० वाजता खडसे यांच्या मोबाइलवर ००२५७७१०४३७७१ या क्रमांकावरून फोन आला. संबंधित व्यक्तीने ‘संभलके रहना’ इतकेच बोलून फोन कट केला. त्यानंतर खडसे यांचे अंगरक्षक असलेले पोलीस शिपाई गणेश पाटील व पोलीस हेड कॉन्स्टेबल तुषार मिस्तरी यांच्या मोबाइलवरही धमकीचा तसाच फोन आल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत स्वत: खडसे यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली असून, संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.
पोलिसांनी दिवसभर केलेल्या चौकशीत हा कॉल आफ्रिकेतील बुरुंडी या देशातून आल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, या प्रकरणाची स्थानिक गुन्हे शाखा व सायबर कक्षामार्फत चौकशी सुरू करण्यात आल्याचेही अधीक्षक कराळे यांनी सांगितले. हा कॉल आफ्रिकेतील असल्याचे निष्पन्न होत असले तरी मोबाइल क्रमांक क्लोन करून स्थानिक पातळीवरूनही कोणीतरी हा खोडसाळपणा केल्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. मात्र चौकशीत नेमका प्रकार उघडकीस येईल, असेही कराळे म्हणाले.
धमकी का व कोणाकडून आली, याचा अंदाज लावणे कठीण आहे. कदाचित केवळ त्रास देणे किंवा खोडसाळपणाही असू शकतो. मात्र एखाद्याचा खरंच वाईट हेतू असला तर दुर्लक्ष नको म्हणून पोलिसांकडे तक्रार केली आहे.
- एकनाथ खडसे, माजी मंत्री