एकनाथ खडसेंना पुन्हा मंत्रीमंडळात घेणार - दानवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2016 06:24 PM2016-09-04T18:24:55+5:302016-09-04T18:24:55+5:30
एकनाथ खडसे यांच्यावरील दोन आरोपात ते निष्कलंक ठरले आहेत. तिस-या आरोपाची चौकशी सुरू आहे.
Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. ४ - एकनाथ खडसे यांच्यावरील दोन आरोपात ते निष्कलंक ठरले आहेत. तिस-या आरोपाची चौकशी सुरू आहे. त्यातही ते निर्दोष ठरतील असे वाटते. या पार्श्वभूमीवर खडसे हे पुन्हा मंत्रीमंडळात परततील असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे-पाटील यांनी सोलापूरात आयोजित करण्यात केलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
येथील लिंगशेट्टी मंगल कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांची संघटनात्मक बैठक पार पाडली. या बैठकीनंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेवेळी ते बोलत होते़ यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख, बार्शीचे राजेंद्र मिरगणे, विधान परिषद सदस्य सुजितसिंह ठाकूर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शहराध्यक्ष प्रा़ अशोक निंबर्गी उपस्थित होते.
पुढे बोलताना दानवे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने यंदाचे वर्षे हे निवडणुक वर्षे म्हणून घोषित केले आहे़ त्यादृष्टीने भाजपाचे प्रत्येक वरिष्ठ नेते कामाला लागलेले आहेत. त्याचेच औचित्य साधून रविवारी सोलापूर ग्रामीण, सोलापूर शहर व धाराशिव या जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्त्यांची संघटनात्मक बैठक घेतली़ या बैठकीत आगामी महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका या होणाºया निवडणुकीसंदर्भातील आढावा घेण्यात आला.
यावेळी पुढे काय करायचे याबाबतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केले़ या बैठकीस उत्तर सोलापूर पंचायत समितीचे सदस्य इंद्रजित पवार, सप्तरंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल सुतार, भाजपाचे नगरसेवक जगदीश पाटील, नरेंद्र काळे, दक्षिण तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, उत्तर सोलापूर भाजपा तालुकाध्यक्ष काशीनाथ कदम, सतीश लामकाने, करमाळ्याचे महेश चिवटे, माढ्याचे संजय कोकाटे, सांगोल्याचे श्रीकांत देशमुख, पंढरपूरचे बागल आदी मान्यवर उपस्थित होते़
महामंडळाच्या नियुक्ती लवकरच
राज्यात भाजपाची सत्ता आल्यापासून महामंडळाच्या नियुक्त्या रखडलेल्या आहेत़ या नियुक्त्या येत्या काही दिवसातच पूर्ण करण्यात येतील़ शिवाय स्थानिक पातळीवरील समित्यांची नियुक्ती ही त्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री लवकरच करतील त्याबाबतच्या सूचना दिल्याचे दानवे यांनी यावेळी सांगितले.